लग्न सोहळयात महिलेनं नृत्य थांबवलं म्हणून तिच्यावर गोळी झाडण्यात आली. उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमध्ये ही धक्कादायक घटना घडली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. जखमी महिला डान्सिंग ग्रुपची सदस्य होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवण्यात आला आहे.

एका मिनिटाची ही क्लिप आहे. महिलेने नृत्य थांबवल्यानंतर दारुच्या नशेत असलेल्या एक व्यक्तीचे “गोली चल जायेगी” हे शब्द ऐकू येतात. भय्या, ‘आप गोली चलाही दो’ असे एक व्यक्ती बोलतो आणि तितक्यात महिलेवर गोळी झाडली जाते. अचानक एकाएकी घडलेल्या घटनेने सर्वचजण स्तब्ध होऊन जातात.

महिलेच्या चेहऱ्याला गोळी लागली असून तिला कानपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. एक डिसेंबरचा हा व्हिडीओ असून गावच्या प्रमुखाच्या मुलीच्या लग्नसोहळयात डान्सिंग ग्रुप कार्यक्रम सादर करताना ही घटना घडली. गावच्या प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्यानेच हा गोळीबार केला.

नवरदेवाचे दोन नातेवाईकही या गोळीबारात जखमी झाले आहेत. पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत. अशीच घटना पंजाबच्या भतिंडा शहरात २०१६ मध्ये घडली होती. सेलिब्रेशनसाठी केलेल्या गोळीबार २५ वर्षीय डान्सरचा मृत्यू झाला होता.