विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ विजयाचा दावेदार मानला जात असून यावेळी सर्वांचं लक्ष भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे आहे. विराट कोहली नेहमीच आपल्या फिटनेसकडे आवर्जून लक्ष देत असतो. विश्वचषक स्पर्धेदरम्यानही विराट कोहली स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अफाट मेहनत आहे. विश्रांतीच्या दिवशीही विराट कोहली जीममध्ये घाम गाळत असून २७ जून रोजी होणाऱ्या वेस्ट इंडिजविरोधातील सामन्याआधी कसून तयारी करत आहे.

कर्णधार विराट कोहलीने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत विराट कोहलीने जीममध्ये प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. यावेळी व्हिडीओला कॅप्शन देताना विराट कोहलीने लिहिलं आहे की, ‘कोणतीही सुट्टी नाही, मेहनतीशिवाय काहीच केलं जाऊ शकत नाही’. विराट कोहली गेल्या काही वर्षांपासून आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देत आहे. यामुळेच ३० वर्षीय विराट कोहली अनेक नवोदित खेळाडूंचा आदर्श आहे.

दरम्यान वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. यापैकी चार सामने भारताने जिंकले असून पावसामुळे एक सामना रद्द झाला. गुणतालिकेत भारतीय संघ ९ गुणांसहित तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण सेमी फायनमध्ये खेळण्यासाठी भारताला चारपैकी दोन सामने जिंकण्याची गरज आहे.

भारतीय संघ अत्यंत सहजपणे सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल असा विश्वास चाहते व्यक्त करत आहेत. गुणतालिकेत सध्या न्यूझीलंड संघ पहिल्या तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडने सहा सामने खेळले असून पाच सामने जिंकले आहेत. भारतीय संघाविरोधातील सामन्यात पाऊस पडल्याने तो रद्द झाला होता. तर ऑस्ट्रेलियाने सहापैकी पाच सामने जिंकले असून भारताविरोधातील सामन्यात पराभव झाला होता.