सध्या डिजीटल विश्वात इमोजींना फार महत्त्व आहे. मेसेजवर आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील तर त्यासाठी विविध इमोजी वापरल्या जातात. हसताना, रडताना, खेळताना असे असंख्य इमोजी स्मार्टफोनवर उपलब्ध असतात. फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या युगात हे इमोजी जणू आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. १७ जुलै रोजी ‘जागतिक इमोजी दिवस’ साजरा केला होता. याच दिवशी भारतात कोणता इमोजी सर्वाधिक वापरला जातो, हे जाहीर केलं जातं.

भारतात आनंदाचे अश्रू येणारा आणि ब्लोईंग किसचा इमोजी सर्वाधिक वापरला जातो. ‘बोबल एआई’ या टेक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार या दोन इमोजींना भारतीयांची सर्वाधिक पसंती आहे. तर टॉप १० इमोजींमध्ये स्माइलिंग फेस विद हार्ट, किस मार्क, ओके हँड, लाऊडली क्राईंग फेस, बीमिंग फेस विद स्माइलिंग आइज, थम्स अप, फोल्डेड हँड्स आणि स्माइलिंग फेस विद सनग्लासेस यांचा समावेश आहे.

सणासुदीच्या दिवसांत भारतात इमोटिकॉन्सचा वापर सर्वाधिक होतो. बोबल एआईचे सहसंस्थापक अनित प्रसाद याविषयी म्हणतात, ‘इमोजी हळूहळू आपल्या डिजिटल संस्कृतीचा एक भाग झाले आहेत. संवाद साधण्याचा हा एक नवा मार्ग आहे.’