इराणमध्ये एका २३ वर्षीय तरुणीने शिक्षेच्या भितीने स्वत:ला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे ही तरुणी केवळ मैदानात पुरुषांचा फुटबॉल सामना पहायला गेली म्हणून तिला ताब्यात घेण्यात आले होते. याप्रकरणात आपल्याला कमीत कमी सहा महिन्याचा तुरुंगवास होणार या कल्पनेने घाबरलेल्या तरुणीने स्वत:ला जाळून घेतले. सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ९ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला.

सहर खोडियारी असे या तरुणीचे नाव आहे. २ सप्टेंबर रोजी तिला देशाची राजधानी असणाऱ्या तेहरानमधील एरशाद येथील न्यायलात हजर करण्यात आले होते. तेथेच तिने स्वत:ला आग लावून घेतली. पुरुषांचा फुटबॉल सामना पाहण्यासाठी ही तरुणी लपून मैदानात गेली होती. त्यावेळी तिला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले. इराणमध्ये महिलांनी पुरुषांचे सामने मैदानात जाऊन पाहणे कायद्याने गुन्हा आहे.

सहरने स्वत:ला आग लावून घेतल्यानंतर तिला उपचारांसाठी तेहरानमधील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सहर ९० टक्के भाजली होती असं रोकना या इराणमधील वेबसाईटने आपल्या वृत्तात म्हटले आहे. ‘इराणमधील कायद्यानुसार आपल्याला आता सहा महिने तुरुंगवास होणार या कल्पनेने ती घाबरली होती. न्यायलयाच्या सुनावणीआधीच तिला तीन दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते,’ अशी माहिती सहरच्या वडिलांनी वेबसाईटशी बोलताना दिली.

या सर्व धक्कादायक प्रकारानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) पत्रक जारी करुन इराणमधील या नियमासंदर्भात आक्षेप नोंदवला आहे. ‘फिफाच्या सद्भभावना सहरच्या कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत आहेत. स्टेडियममध्ये येऊन सामना पाहण्यास महिलांना असणाऱ्या बंदीविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची आणि स्वातंत्र्याची काळजी इराणमधील सरकारी यंत्रणांनी घ्यायला हवी अशी आमची अपेक्षा आहे,’ असं फिफाने या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

सहर दिसायला खूप सुंदर होती. तिचे स्टेडियमवर परिधान केलेली जर्सी ही निळ्या रंगाची होती. म्हणूनच या घटनेची माहिती सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर फुटबॉलप्रेमींने #BlueGirl हा हॅशटॅग वापरुन तिला श्रद्धांजली अर्पण करण्याबरोबरच या घटनेचा आणि इराणमधील नियमांचा निषेध केला.

इराणमधील सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लब असणाऱ्या एस्तेघलाल या क्लबनेही ट्विटवरुन या घटनेचा निषेध केला आहे.

इराणमधील अनेक महिलांनी या घटनेचा सोशल नेटवर्किंगवरुन निषेध नोंदवला असून महिलांशी दुजाभाव करणाऱ्या या नियमाचा विरोध करण्यासाठी त्यांनी सहर खोडियारीच्या नावाने मोहिम सुरु करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. ब्रिटनमधील अॅमेस्टी इंटरनॅशनल या मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेनेही या घटनेनंतर पत्रक जारी करुन इराणमधील हा शिया कायदा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. ‘फुटबॉल पाहण्यासाठी महिलांना शिक्षा देणाऱ्या इराण हा जगातील एकमेव देश आहे,’ असं अॅमेस्टीने म्हटलं आहे. इराणमध्ये महिलांवर स्टेडीयममध्ये बंदी घालण्याचा कायदा १९७९ साली तयार करण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या इस्लामिक क्रांतीनुसार वयात आलेल्या महिलांना स्टेडीयममध्ये येणे गुन्हा असल्याचा कायदा तयार करण्यात आला होता. अनेक दशकांनंतरही तो कायदा अस्तित्वात असल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.