‘संगीत’ हे एक असे माध्यम आहे, ज्यातून व्यक्त होता येते. भावनांचा बांध बांधून तोच बांध तोडण्याची ताकदही याच संगीतात आहे. शब्दांची सुरेल गुंफण जितकी सुश्राव्य असते तितकेच शांततेचे अस्त्वित्वही बऱ्याचदा एक वेगळीच तान छेडून जाते. रॅप साँगच्या साथीनं ‘यो.’ म्हणणारी पिढी जितक्या आदबीने हे रॅप मिरवते तीच पिढी रफी, मुकेशच्या गाण्यांवर जॅमिंग सेशन्सही करते. पण यापलीकडेही संगीतामध्ये काही सुरेख कलाकारांची नव्याने ओळख होत आहे. मुख्य म्हणजे जागतिक स्तरावर संगीतकलेचं एक वेगळं रुप पाहायला मिळतं आहे. तंत्रज्ञानाची जोड घेत हे कलाकार तरूणाईच्या प्लेलिस्टसोबतच त्यांच्या जगण्याचाही अविभाज्य भाग झाले आहेत. आज २१ जून आजचा दिवस जगभरात ‘जागतिक संगीत दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जागतिक पातळीवर संगीत दिन साजरा करण्याची प्रथा फ्रांन्सने पाडली. फ्रान्समध्ये या दिवसाला ‘फेटे डे ला म्यूसिक’ असे म्हटले जाते. सर्वात प्रथम लोकप्रिय फ्रेंच संगीत दिग्दर्शक ‘मॉरीश फ्लेरेट’ व ‘जॅक लँग’ यांनी हा दिवस साजरा करण्याची प्रथा फ्रान्समध्ये सुरु केली. त्यानंतर संगीत विशारद ‘लॉर्ड मेहुदी मेनुहीन’ यांनी १९८१ साली जगात शांती प्रस्थापीत करण्याच्या उदिष्टाने जागतीक पातळीवर संगीत दिन साजरा करण्याची प्रथा सुरु केली. आज ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्रिटन, जर्मनी यांसारख्या अनेक देशांमध्ये संगीत दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सर्वसामान्य जनतेत संगीताची आवड निर्माण व्हावी यासाठी अमेरिकेत २००७ पासून संगीत दिन साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. या दिवशी लोकप्रिय संगीतकारांची भाषणे, परिसंवाद, संगीत स्पर्धा, संगीत वाद्यांचे प्रदर्शन यांसारखे अनेक उपक्रम भरवले जातात.