‘ए आजी, मला गोष्ट सांग ना!’, ‘एकदा काय झालंssss’ किंवा ‘दूर दूर एक गाव होतं….’ एकेकाळी रात्री झोपताना हे किंवा यासारखी वाक्यं आपल्यापैकी अनेकांनी ऐकलीत. आजी-आजोबांच्या कुशीत बसून परीराणी किंवा राजपुत्रापासून ते लढवय्ये शूरवीर, निधड्या छातीचे नायक आणि पुराणकाळातील पात्रांच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत. या गोष्टी आपल्याला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जात असत. हे गोष्टींचं जग जादूमय असे. प्रत्यक्षापेक्षा कित्येकपटीने मजेदार, विस्मयजनक असे. आता हेच जग पुन्हा अवतरते आहे काही अत्यंत मनोरंजक अशा कथांमधून. ‘ऑडिबल’ तर्फे येत्या जागतिक कथाकथन दिवसाचे औचित्य साधत अशाच काही आठवणीतल्या पोतडीत कायमस्वरुपी असणाऱ्या कथा श्राव्य माध्यमातून रसिक श्रोत्यांसाठी सादर करण्यात येत आहेत.

जे. के रोलिंग यांची ‘हॅरी पॉटर’
हॅरी, हार्मनी आणि रॉन या तीन मित्रांच्या भन्नाट कथानकांनी एका पिढीला वेड लावलं होतं. फक्त हॅरी पॉटर एवढं नाव घेतलं तरी आपल्याला काहीतरी चित्ताकर्षक वाचायला, पाहायला मिळणार, याची खात्रीच या कथानकांनी आणि त्यातल्या पात्रांनी वाचक-प्रेक्षकांना दिली होती. आता ही सगळी कथामालिका स्टीफन फ्राय यांच्या शैलीदार आवाजात श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे.

हुसेन झैदी आणि जेन बोर्गेस लिखित ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’

ऑडिबलची भारतातली पहिली निर्मिती असणाऱ्या या कथामालेत मुंबई गुन्हेगारी विश्वातील १३ सर्वाधिक खतरनाक महिला डॉन्सच्या आयुष्यातीला थरकाप उडवणारी कहाणी आवाजबद्ध करण्यात आली आहे. या कथा राजकुमार राव, राधिका आपटे आणि कल्की कोचलिन यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहेत.

 

जेफ्री आर्चर लिखित ‘केन अँड एबेल’

विल्यम लॉवेल केन आणि एबेल रोस्नोवस्की यांच्यात एकच समान धागा असतो. एक बोस्टनचा कोट्यधीश; तर दुसरा फुटकी कवडी नसणारा पोलिश निर्वासित. दोन व्यक्ती. एकाच दिवशी जगाच्यादोन टोकांना  जन्मलेल्या. नशीब आजमावण्याच्या खडतर प्रवासात त्यांची एकमेकांशी गाठ पडणे, हा नियतीचा खेळ. साठ वर्षांच्या कालावधीत घडणारे हे जबरदस्त कथानक दर्शवते दोन ताकदवान व्यक्तींशी एकमेकांशी होणारी टक्कर-पराकोटीच्या द्वेषातून जन्मलेली. आधी एकमेकांना वाचवण्यासाठी आणि नंतर एकमेकांना संपवण्यासाठी! जेसन कल्प यांच्या आवाजात ही प्रसिद्ध कथा ऐकायला मिळणार आहे.

दुर्जोय दत्ता लिखित ‘द लास्ट बॉय टू फॉल इन लव्ह’

एका व्हायरसमुळे अवघ्या जगाची लोकसंख्या नाहीशी झाली आहे. दिल्लीत राहणारे अमर्त्य आणि एरीका एवढेच काय ते वाचलेत आणि  आता त्यांना पुढे वाट काढायची आहे. ते पहिल्यांदाच भेटतात तेव्हा त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होणार, याची वाचकांनाही खात्री पटते, पण पुढे कथानकाला भलतीच कलाटणी मिळते. दोघांकडेही आपापली अशी गुपिते असतात आणि त्या गुपितांमुळेच त्यांच्या प्रेमकहाणीमध्ये गडबड होणार असते. त्यांचे जगणे, हे मनुष्यजातीच्या अस्तित्त्वासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. पण त्यांच्या स्वत:च्या भविष्यात मात्र भलतेच काहीतरी घडणार असते. ही  कथा सिकंदर खेर आणि रसिका दुग्गल यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे.

अनंत नीलकंठन लिखित ‘राइझ ऑफ काली’
जय ही कथा कुरुक्षेत्रातील विजयी पांडवांची; तर अजय ही कथा शेवटचा योध्दा जिवंत असेपर्यंत लढणाऱ्या कौरवांची. असूर या कथेतून रावणाची गोष्ट सांगणाऱ्या या लेखकाच्या लेखणीतून महाभारतासारख्या महाकथेमागील खरे कथानक काय असेल, असा प्रश्न निर्माण करणारी ही कादंबरी आहे. सिद्धांत पिंटो यांच्या आवाजात ती ऐकायला मिळणार आहे.