भारताच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ती जगातील सगळ्यात उंच इमारत बुर्ज खलिफा ही तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाली आहे. बुधवारी रात्री तिरंग्याच्या रंगाची रोषणाई या इमारतीवर करण्यात आली.

बुर्ज खलिफाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या इमारतीचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत. भारताच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही बुर्ज खलिफावर तिरंगी रोषणाई केली आहे असे ट्विट त्यांनी केले. दुबईमध्ये असणारी बुर्ज खलिफा ही जगातील सगळ्यात उंच इमारत आहे. तिची उंची ८२३ मीटर आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील अनेक मह्त्त्वाच्या वास्तू आणि इमारतींना तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवन, मुंबई शेअर बाजाराची इमारत, सीएसटी स्थानक, मंत्राल, मध्य प्रदेश विधानभवन अशा अनेक इमारतींना तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरून अबुधाबीचे युवराज मोहम्मद बिन झायेद अल नहयान हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबुधाबीचे युवराज मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांच्यात करारांची देवाणघेवाण झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी युवराज नहयान यांचे आभार मानले. भारतात मुलभूत क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या युएईच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, असे मोदी म्हणाले. त्यामुळे भारत आणि युएईच्या मैत्रिचे प्रतिक म्हणूनही जगातील या उंच इमारतीला तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.