‘व्हॅलेंटाईन  डे’ चा ज्वर आता ओसरायला लागलाय. अलीकडे  हा ज्वर लगेचच ओसरतो. आणि अनेकांना आपण जन्मजन्मांतरीचे सोबती नसल्याचा साक्षात्कार होतो. ‘चट मंगनी पट  ब्याह’ सारखं आता ब्रेक अप करणं काॅमन झालंय. अर्थात यात काही वाईटही नाही म्हणा. त्यांचं त्यांचं आयुष्य. त्यांचा त्यांचा अधिकार.

एका पार्टीत ‘त्याने’ ‘तिला’ पाहिलं. तिनेही त्याला नोटीस केलं. ‘तू माझ्यासोबत डान्स करशील का?’ असा संदेश त्याने आपल्या मित्राकरवी तिच्याकडे पाठवला. तीसुध्दा हुशार, ‘त्याला डान्स करायचा आहे ना? तर मग त्यालाच पुढे येईन विचारू देत’ असा निरोप तिने त्या मित्राकडे दिला. तेव्हा लाजत लाजत त्याने पुढे येत तिला डान्स करण्याविषयी विचारलं. तिने आनंदाने हो म्हटलं आणि मग पार्टी संपेपर्यंत ते दोघे  एकमेकांच्या बाहुपाशात नाचत राहिले.

त्याचं वय होतं ९६, तर ती होती ९२ वर्षांची…!!

गेल्या ५० वर्षांपासूनपेक्षा जास्त काळ हे दोघे एकमेकांसोबत दरवर्षी न चुकता व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. पण प्रत्येक वर्षी त्यांच्या या सेलेब्रेशनमध्ये तीच नवलाई असते, तीच हुरहूर असते, आणि गेल्या अर्ध्या शतकात एकमेकांविषयीचा वाढत गेलेला आदर,  एकमेकांविषयीचं उत्कट प्रेम आजही तसंच असतं.

हे दोघे प्रेमवीर म्हणजे जाॅन मॅक्के आणि त्याची बायको एडिथ स्टायनर. त्यापैकी जाॅन आहे स्काॅटिश तर एडिथ आहे हंगेरियन ज्यू. युरोपात दुसरं महायुध्द पेटलेलं असताना हिटलरने युरोपातल्या ज्यूंची छळछावणीत रवानगी करायला सुरूवात केली होती. या छळछावण्यांमध्ये या ज्यूंना हालहाल करून ठार मारण्यात आलं. गॅसचेंबर्समध्ये कोंडल्याने जे मारले गेले नाहीत त्यांचा मृत्यू रोगराई, उपासमार अशा अनेक कारणांनी झाली. साठ लाख ज्यू दुसऱ्या महायुध्दाच्या काळात मारले गेले.

अशाच एका छळछावणीतून जाॅन मॅक्के ने एडिथची सुटका केली होती. त्याकाळी युरोपात असणाऱ्या छळछावण्यांपैकी सगळ्यात भयानक अशा आॅशवित्झ छळछावणीत एडिथ आणि तिच्या कुटुंबीयांची रवानगी झाली होती. त्यावेळी जाॅन जर्मनीविरोधात लढणाऱ्या दोस्तराष्ट्रांच्या सैन्याकडून लढत होता. आॅशवित्झ छळछावणीतून जिवंत बाहेर पडलेल्या ज्यूंची संख्या अतिशय थोडी आहे. एडिथचं कुटुंब त्यापैकी एक होतं. एडिथ त्यावेळी २० वर्षांची होती.

महायुध्दानंतर हे दोघेजण स्काॅटलंडमध्ये गेले आणि तिथेच स्थायिक झाले. आता त्यांच्यामागे त्यांची दोन मुलं , पाच नातवंडं तर सात पणतू असा मोठा कुटुंबकबिला आहे. हे दोघेही आता त्यांच्या मर्जीने वृध्दाश्रमात राहतात. त्यांच्यात इतकी वर्षं असलेला प्रेमाचा धागा आजही जसाच्या तसा आहे.

मध्यंतरी एक जोक व्हाॅट्सअॅपवर फिरत होता.

‘नातू आजोबांना विचारतो

‘तुम्ही आणि आजी इतकी वर्षं एकत्र राहूच तरी कसे शकलात?’

आजोबांनी म्हटलं

“बाळा मी अशा काळात जन्माला आलो होतो ज्या काळात जर एखाही वस्तू तुटली तर ती जिवाच्या आकांताने दुरूस्त केली जात असे”‘

जाॅन आणि एडिथच्या कथेवरून ही गोष्ट जगभर होती हेच पटतं नाही का?