जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतीय रेल्वेकडून जम्मू काश्मीरमध्ये बांधण्यात येत आहे. उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वेकडून उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला दरम्यानचा चिनाब नदीवर रेल लिंक प्रकल्प उभारण्यात आला आहे. ताशी ८० किलोमीटर वेगाने लांबपल्ल्याची गाडी एका मिनिटात पूल पार करेल. सध्या या पूलाचे काम जोरात सुरू असल्याने हा पूल डिसेंबर २०२१पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या पुलाच्या कामासाठी दोन हजारपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. छोट्या-छोट्या भूकंपामुळे पुलाचे काम करताना समस्या येतात. तर या भागात असलेल्या लहान रस्त्यांमुळे साहित्य घेऊन येणाऱ्या अवजड वाहनांनाही अडथळा येतो. तरीही पूल वेळेतच पूर्ण होईल असा दावा करण्यात आला आहे. ३५९ मीटर म्हणजेच १,११७ फूट उंचीचा हा पूल बांधून पूर्ण होईल, तेव्हा तो जगातील सर्वाधिक उंचीचा पूल असेल. प्रत्येक भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट असणार आहे. भारताच्या या चिनाब नदीवरील पुलासमोर आयफल टॉवरही ठेंगणं दिसेल. या पुलाची १० वैशिष्ट्ये जाणून घ्या..

– आयफेल टॉवरची उंची ही ३२४ मीटर आहे. तर चिनाब नदीवर बनविला जाणारा पूल हा ३५९ मीटर उंच आहे. आयफेल टॉवरपेक्षा हा पूल ३५ मीटर उंच आहे. सध्या चीनमधील बेपान नदीवरील २७५ मीटर उंचीवरील शुईबई रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच पूल असून, काश्मीरमधील पूल त्याला मागे टाकणार आहे.

– ४० किलोपर्यंतचा टीएनटी ब्लास किंवा आठ रिश्टर स्केलपर्यंत भूकंपाचे धक्के बसले तरीही रेल्वे प्रति तास ३० किमी वेगाने धावेल. शिवाय अतिक्षमतेच्या ब्लास्ट जरी झाला तरीही पूलाच्या खांबाला सुद्धा काही होणार नाही.

– जम्मू-कश्मीरमध्ये सतत होणारे दहशदवादी हल्ले आणि भूंकपाची शक्यता लक्षात ठेवून पूलाला ६३ मिलीमीटर (सहा इंच) ब्लास्ट प्रूफ स्टीलचे आवरण लावण्यात आले आहे.

– येथील पूलाच्या कामावर सीसीटीव्हीच्या माध्यामातून पंतप्रधान कार्यालय आणि भारतीय रेल्वे बोर्ड नजर ठेवून आहे. एक मिनीट जरी सीसीटीव्ही बंद झाल्यास पंतप्रधान कार्यालयाचा फोन रेल्वेला येतो.

– प्रतितास २६० किमी वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगालाही झेलण्याची क्षमता या पूलामध्ये आहे. वारा आणि पावसामध्येही या पूलावरून रेल्वे प्रतितास ९० किमीच्या वेगाने धावेल, अशी रचना करण्यात आली आहे.

– या पुलाच्या सुरक्षेसाठी आकाशातून विशेष लक्ष ठेवण्याची शक्यता आहे. त्यासाठी विविध उपाययोजनावर काम सुरू आहे. तसेच पूलावरून जाणाऱ्या गाड्यांना आणि प्रवाशांना अतिगंभीर परिस्थितीत संरक्षण देण्यासाठी पुलावर ऑनलाइन देखरेख आणि व चेतावणी यंत्रणा देखील बसविण्यात येईल.

– या पुलाच्या खांबाची विशेष पद्धतीनं रचना करण्यात आली आहे. हे काँक्रीटचे खांब मोठ्या स्फोटांना सामोरे जाण्यास सक्षम असतील. या खांबावर विशेष गंज-प्रतिरोधक पेंट लावला आहे. जो १५ वर्षांपर्यंत खांबाला गंज लागू देणार नाही.

– रेल्वेच्या दीडशे वर्षांच्या इतिहासातील हे सर्वाधिक आव्हानात्मक काम आहे. ‘अभियांत्रिकी चमत्कार’ ठरणारा हा पूल काश्मीरला रेल्वेमार्गाने उर्वरित देशाशी जोडणारा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ठरेल. पुलाच्या बांधकामासाठी ५,४६२ टन लोखंड वापरण्यात आले

– या पूलावर रेल्वेसोबत सायकल टॅक, फूटपाथही तयार करण्यात आला आहे. लवकरच तयार होणाऱ्या या पूलावमुळे उधमपूर-कतरा-कझीगड हे अंतर अवघ्या सहा तासांत पार होईल. सध्या हे अंतर पार करण्यासाठी १२ ते १४ तास लागतात.

– या पूलाच्या कामाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच या प्रकल्पाला केंद्राकडून पूर्ण अनुदान देण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमधील बक्कल ते कौरई दरम्यान चिनाब नदीवर हा पूल तयार करण्यात येत आहे.