चावणारे आणि झोपल्यावर कानाशी गुणगुण करणाऱ्या डासांवर आपल्यातील प्रतेयकजण कधी ना कधी वैतागलेला असतोच. रात्रीच्या वेळी शांतपणे झोपू न देणाऱ्या डासांपासून संरक्षण करण्यासाठी आपण एकाहून एक असे उपाय अवलंबतो. आता कधी हे डास लहान असतात तर कधी मोठे. आपलं रक्त पिऊनच हे डास मोठे झालेत असंही रागाने आपण अनेकदा म्हणतो. पण मोठा म्हणजे किती असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर आपल्या बोटाच्या पेराइतका असं आपण सांगू शकतो. मात्र चीनमधील डासाचा आकार पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. याचे कारण म्हणजे चीनमध्ये नुकताच एक सर्वात मोठा डास सापडला आहे.

चीनमधील सिचुआन प्रांतात कीटकतज्ज्ञांनी एका भल्यामोठ्या डासाचा शोध लावला आहे. या डासाच्या पंखांचा विस्तार सुमारे ११.१५ सेंटीमीटर इतका आहे. चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार हा डास मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सापडला होता. हा डास जगातील सर्वात मोठ्या डासांची प्रजात असलेल्या हालोरुसिया मिकादो वर्गातील आहे असे पश्चिम चीनमधील कीटक संग्रहालयाचे क्युरेटर चाओ ली यांनी सांगितले. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार सर्वसामान्यपणे या प्रजातीमधील डासांच्या पंखांचा विस्तार हा ८ सेंटीमीटर पर्यंत असतो. पण हा नवा डास नेहमीपेक्षा खूपच मोठा असून ही प्रजात सर्वप्रथम जपानमध्ये आढळल्याचा दावा जपानने केला आहे.

आता इतका मोठा डास माणसाला चावला तर काय होईल असा प्रश्न साहजिकच आपल्यातील अनेकांना पडला असेल. पण हा डास माणसांना चावत नसून तो फुलांमधील परागकण हे त्यांचे मुख्य अन्न असते. या प्रजातीमधील प्रौढ डासांचे आयुर्मान काही दिवसांचेच असते. डास चावल्याने होणारे डेंगी, मलेरीया हे आजार दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत असतानाच जगातील सगळेच डास माणसांसाठी त्रासदायक नसतात. जगभरात डासांच्या हजारो प्रजाती असून त्यातील केवळ १०० प्रजातीच व्यक्तीसाठी त्रासदायक आहेत असे चाओ ली म्हणाले.