या महिलेच्या करामती पाहून तुम्ही अक्षरशः बोटे तोंडात घालाल. तिचे शरीर इतके लवचिक आहे की ते कोणत्याही स्थितीत लवते. तिच्या एक-एक कसरती पाहून त्या करण्याचा साधा विचारही आपण करु शकत नाही. ही जिम्नॅस्टिकपटू रशियाची असून तिचे नाव आहे ज्यूलिया (झलाटा) असे आहे. तिचे शरीर रबराइतके लवचिक आहे. तिच्यातील या कौशल्यामुळे जगातील सर्वात लवचिक महिला म्हणून तिची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तिने आपल्या या करामती करुन दाखविल्या तेव्हा रेकॉर्ड बुकचे अधिकारीही अचंबित झाले. मात्र यासाठी तिने अनेक वर्ष मेहनत केली असल्याचे ती सांगते.

३१ वर्षांच्या ज्यूलियाचे आपल्या शरीरावर अतिशय उत्तम पद्धतीने नियंत्रण आहे. तिला गिनिज बुकचा मान मिळणे अतिशय साहजिक आहे. कारण तिच्या एकाहून एक सरस अशा हालचाली पाहून आपण आश्चर्यचकित नाही झालो तरच नवल. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ज्यूलियाची हाडे खूप जास्त लवचिक आहेत. नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या शरीराहून तिचे शरीर जास्त लवचिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिचे काही व्हिडिओ यु-ट्यूबवर उपलब्ध असून नेटिझन्सकडून त्यांना मोठी पसंती मिळते.

ज्यूलिया इतकी लवचिक आहे की ती ५० सेमीच्या चौकोनी बॉक्समध्ये स्वतःला बसवू शकते. ज्यूलिया ८ वर्षांची असताना आपल्यात काहीतरी वेगळपण आहे, य़ाची तिला जाणीव झाली होती. त्यानंतर वयाच्या १० व्या वर्षांपासून ती आपल्या करामती दाखवायला लागली. त्यानंतर अशाप्रकारे कसरती करुन दाखवणे हे तिने आपले प्रोफेशनच केले. तिने पायाने जास्तीत जास्त बाटल्या उघडल्याने गिनिज बुकने तिची नोंद घेतली.