आज एम्मा मोरानो यांचा ११७ वा वाढदिवस आहे. त्या खास यासाठी आहेत कारण १९ व्या शतकात जन्मलेल्या आणि अद्यापही जिवंत असलेल्या त्या एकमेव आहेत. २९ नोव्हेंबर १८९९ मध्ये त्यांचा जन्म झाला होता.

एम्मा मोरोन या उत्तर इटली मधील बर्वेनिया शहरात राहतात. जगातील सगळ्यात वृद्ध महिला म्हणून त्या ओळखल्या जातात. उत्तम आरोग्य राहावे यासाठी रोज त्या दोन अंडी आणि कुकिज खातात. दात पडल्याने आपल्याला काहीच खाता येत नाही यानी खंत त्या व्यक्त करतात. जगातील सगळ्यात वृद्ध महिला असल्याचा गिनिझ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. एम्मा यांना आठ भावंडे होती. एम्मा या सगळ्यात जेष्ठ होत्या. त्यांच्या कुटुंबियांपैकी दुर्दैवाने आज कोणीही जिवंत नाही. एम्मा यांची भावंडे देखील त्यांच्या प्रमाणे दिर्घ काळ जगली.

वाचा : मरणासन्न अवस्थेत असलेल्या कुपोषित बालकाला ‘तिने’ दिले जीवनदान

एम्मा यांना एकुलता एक मुलगा होता. पण तोही जन्मल्यानंतर ६ महिन्यात वारला. त्यानंतर नव-याच्या छळाला कंटाळून त्यांनी घरही सोडले. तेव्हापासूनच त्या एकट्याच राहतात. इटलीच्या त्यांच्या दोन खोलींच्या  घरात त्या एकांतात राहणे पसंत करतात. गेल्या काही वर्षांपासून त्यांची मदत करायला एक मदतनीस असतो. तो एम्मा यांची काळजी घेतो. एम्मा यांना वयामुळे ऐकू कमी येते तसेच त्यांना अधुंकही दिसते. एका वृत्तसंस्थेत दिलेल्या मुलाखतीत मला पाहण्यासाठी वेगवेगळ्या देशातून लोक येतात असे त्या अभिमानाने सांगतात. त्यांच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेकांनी एम्मा यांच्या घरी उपस्थिती लावली आहे. पण एम्माने मात्र केक कापून आपला वाढदिवस साजरा करायला नकार दिला आहे. केक कापला की दिवस खराब जातो असे त्या मिश्किलपणे म्हणतात. त्यांच्या वाढदिवसाला वर्बेनियाच्या मेयर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपटही दाखवला जाणार आहे. ‘एक महिला जिने तीन शतके पाहिलीत’ असे या चित्रपटाचे नाव असेल.