माहितीच्या महाजालातील कोणे एके काळी आपली पकड बसवून असणारी याहू ही कंपनी आता आपले नाव बदलणार आहे. याहूच्या सीईओ पदावर कार्यरत असलेल्या मेरिसा मेयर राजिनामा देणार आहेत. तर याहू आपले नाव बदलून ‘अल्टाबा’ ठेवणार असल्याच्या चर्चा ही रंगत आहेत.
याहू आपल्या इंटरनेट व्यवसायाचा मोठा भाग ‘वेरिझाॅन’ला विकणार आहे. अनेक इंग्रजी संकेत स्थळांच्या माहितीनुसार जो भाग याहूकडे राहिला आहे त्याचे नाव अल्टाबा ठेवण्याचा विचार याहू कंपनी करत आहे. ‘वेरिझाॅन’ने ही कंपनी ४.८३ अब्ज डॉलरला विकत घेतली. तर जो भाग याहू कंपनीकडे असेल त्यात चिनी कंपनी ‘अलीबाबा’ची भागीदारी असणार आणि याचवरून याहूचे नाव ‘अल्टाबा’ होण्याची शक्यता आहे. ‘अल्टाबा’ म्हणजे ‘अल्टरनेटिव्ह अँड अलीबाबा’ असे असून संक्षिप्त रुपात ही कंपनी ‘अल्टाबा’ म्हणून ओळखली जाणार आहे. ‘वेरिझाॅन’ शी व्यवहार पक्का झाल्यानंतर याहू कंपनी बोर्डचे १० सदस्य आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे. त्यानुसार सीईओ मेरिसा मेयर आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून याहू वादात सापडली होती. याहू युजर्सचे अकाऊंट हॅक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या. २०१३ मध्ये कोट्यवधी याहू युजर्सचे अकाऊंट हॅक झाले होते. तर २०१४ मध्येही ५० कोटी युजर्सचे अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले होते. या सगळ्या युजर्सचे नाव, पत्ते, फोन क्रमांक, पासवर्ड, इमेल ब्लॉक करण्यात आले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2017 4:39 pm