बिहारमधील रोहतास जिल्ह्यात नुकतीच एक अजब घटना घडली. याठिकाणी एका व्यक्तीला लोकांनी चोर समजून पकडले. एका घरात लपून जात असताना त्याला त्या घरातील लोकांनी पकडले. विशेष म्हणजे पकडलेल्या या मुलाचे आपल्या मुलीशी लग्नच लावून दिले. आता असे कसे झाले, तर चोर वाटलेला हा व्यक्ती चोर नसून या मुलीचा प्रियकर होता. त्याला पकडल्यानंतर त्याने ही गोष्ट घरच्यांना सांगितली आणि मग कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या सल्ल्याने हे लग्न लावण्यात आले. या चोर म्हणून पकडण्यात आलेल्या २५ वर्षीय मुलाचे नाव विशाल सिंह असे आहे.

विशाल हा महारा जगंज या गावात राहणारा. त्याचे आपले नातेवाईक भिखारी यादव यांची मुलगी लक्ष्मीना यादव हिच्यावर प्रेम होते. तर यादव कुटुंब बाराडीह या गावी राहणारे. ५ वर्षापूर्वी या दोघांची एका लग्नात भेट झाली होती. विशाल सुट्टीसाठी आपल्या घरी आला असताना लक्ष्मीनाला भेटण्यासाठी त्याने थेट तिचे घरच गाठले. लक्ष्मीना घराच्या खालच्या मजल्यावर आपल्या खोलीत एकटी झोपली आहे हे त्याला माहित होते. तर घरातील इतर मंडळी वरच्या मजल्यावर झोपली होती. घरात चोरुन प्रवेश करताना घरातील एका व्यक्तीने विशालला पाहिले. चोर समजून हा व्यक्ती चोर चोर म्हणून ओरडायला लागला आणि विशाल पकडला गेला. मग आजूबाजूच्या गावातील बरेच लोक जमा झाले. आता जमलेले इतके सगळे लोक आपल्याला मारणार असे वाटल्याने विशालसमोर सगळे खरे सांगण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता.

त्याला एका खोलीत बंद करुन ठेवले. इतकेच नाही तर या गोष्टीबाबत पोलीस आणि त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली. विशालचे आजोबा त्यांच्या गावचे माजी सरपंच आणि नामवंत व्यक्ती आहेत. त्यांनी याठिकाणी येत दोन्ही गावांची बैठक बोलवली. विशाल आणि लक्ष्मीना हे दोघेही यादव परिवारातील होते आणि दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. मग दोन्ही परिवारांनी या दोघांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच गावातील एका पंडिताला बोलवून त्यांचे लग्न लावून देण्यात आले. हिंदू पद्धतीने लग्न लागल्यानंतर गावातील उपस्थितांना मिठाई वाटण्यात आली. त्यानंतर विशाल आपल्या पत्नीला घेऊन आपल्या घरी परतला.