विविध व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर तुम्ही प्रँक व्हिडिओंची मजा घेत असाल, पण ही मजा अनेकदा ‘सजा’ ठरते. बऱ्याचदा प्रँक व्हिडिओ बनवणारे स्वतःच प्रँकचे ‘शिकार’ होतात, तर कधी ज्यांच्यावर प्रँक केला जातो त्यांना फटका बसतो. असाच एक धक्कादायक प्रकार अमेरिकेत घडला असून प्रँक व्हिडिओ शूट करणाऱ्याचा गोळी लागून मृत्यू झाला. एक २० वर्षीय तरुण दरोड्याचा प्रँक व्हिडिओ बनवत होता. पण, ज्या व्यक्तींवर तो हा प्रँक करत होता, त्यांनी त्याला खरोखरचा चोर समजून गोळी घातली आणि जागेवरच त्याचा मृत्यू झाला.

कशी झाली घटना?
बीबीसीच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या Tennessee मध्ये ही घटना घडली. मृत तरुण शुक्रवारी रात्री युट्यूबसाठी प्रँक व्हिडिओ शूट करत होता. पण ज्यांच्यावर तो प्रँक शूट करत होता त्या ग्रुपमधील एका व्यक्तीने त्याला खरोखर चोर समजून त्याच्यावर गोळी झाडली.  Nashville पोलिसांना रात्री 9.25 मिनिटांनी एका पार्कजवळ गोळी झाडल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर 20 वर्षीय टिमोथी विल्क्स (Timothy Wilks) याचा मृतदेह दिसला. 23 वर्षीय डेविड स्टार्न्स ज्युनियर (David Starnes Jr.) नावाच्या तरुणाने त्याला गोळी मारली.

प्रँकबाबत नव्हती कल्पना :

तिथे उपस्थितांनी सांगितलं की तो प्रँक व्हिडिओ शूट करत होता. अद्याप घटनेचा तपास सुरू आहे. Wilks आपल्या एका मित्रासोबत एका ग्रुपकडे गेला, त्यांच्यात स्टार्न्स ज्युनियर हा तरुणही होता. प्रँकदरम्यान विल्क्स खरोखर चोर असल्याचा स्टार्क्सचा समज झाला आणि लगेच त्याने त्याच्यावर गोळी झाडली. स्टार्न्सने पोलिसांना सांगितलं की, त्याला प्रँकबाबत काहीही कल्पना नव्हती. स्वतःच्या बचावासाठी गोळी चालवली असं त्याने पोलिसांना सांगितलं. दरम्यान पोलिसांनी अद्याप विल्क्सच्या मृत्यूप्रकरणात कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही, पण घटनेचा तपास सुरू आहे.