Zini Mobiles या कंपनीने जगातील सर्वात लहान Zanco tiny t2 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनसाठी नुकतेच किकस्टार्टर कॅम्पेन लाँच केले आहे. कंपनीने या डिव्हाइसबाबत कॅम्पेन पेजवर काही डिटेल्स शेअर केले आहेत, शिवाय फीचर्सपासून डिझाइनपर्यंत अनेक बाबींबाबत माहिती दिलीये. ‘Zanco tiny t2 मध्ये एखाद्या स्मार्टफोनमध्ये असतात ते सर्व आवश्यक फंक्शन्स आहेत आणि हा फोन मोठ्या फोन्ससाठी छोटा पर्याय म्हणून समोर येईल’, असं कंपनीने म्हटलं आहे. अवघे 31 ग्राम वजन असलेल्या जगातील सर्वात छोट्या 3G डिव्हाइसमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि SOS मेसेज फंक्शनही मिळतील. तसेच फोनमधील बॅटरी सातदिवसांचा बॅकअप देईल असा कंपनीचा दावा आहे.

मल्टिपल फीचर्स असलेल्या या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डिंग, MP3 आणि MP4 प्लेबॅक, गेम्स, कॅलेंडर आणि एफएम रेडिओ हे फीचर्स असतील. याशिवाय कॉलिंग आणि टेक्स मेसेजिंगचाही वापर युजर करु शकतील. कॅलेंडर, अलार्म क्लॉक मॅनेज करण्याचा पर्यायही या फोनमध्ये आहे. याशिवाय स्टोरेज वाढवण्यासाठी कंपनीने फोनमध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉट दिले आहे. याद्वारे 32GB पर्यंत मेमरी वाढवता येईल. तसेच फोनमध्ये दमदार बॅटरीचा वापर करण्यात आला असून एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 7 दिवस बॅटरी टिकेल असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे. तसेच अनेक बिल्ट-इन अॅप्स या फोनमध्ये आहेत. यामध्ये कॅल्क्युलेटर, फाइल मॅनेजर, टास्क मॅनेजर आणि नोटपॅडचा समावेश आहे. आवडीची गाणी देखील फोनमध्ये सेव्ह करता येतील.

एप्रिल 2020 पासून या स्मार्टफोनच्या शिपिंगला सुरूवात होईल, भारतासह युएस, युके, चीन, जपान, जर्मनी आणि नेदरलँड्समध्ये मोफत शिपिंग असेल. युजर्सना हा फोन वेबसाइटवरून बुक करता येईल. सुपर अर्ली बर्ड रिवॉर्डमध्ये(लवकर पेमेंट करणारे) हा फोन 59 डॉलर म्हणजे जवळपास 4 हजार 200 रुपयांपर्यंत खरेदी करु शकतात. सध्या अर्ली बर्ड रिवॉर्डमध्ये ही किंमत 69 डॉलर म्हणजे जवळपास 4 हजार 900 रुपये असून किकस्टार्टर स्पेशल पॅक 79 डॉलर म्हणजे जवळपास 5 हजार 600 रुपयांत खरेदी करता येणार आहे.