मासिक पाळीसंदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आणि हा विषय किती गांभीर्याने घेण्याची गरज आहे यासंदर्भातील जागृतीसाठी झोमॅटो कंपनीने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. झोमॅटोने कंपनीमध्ये काम करणाऱ्या माहिला आणि तृतीयपंथी कर्मचाऱ्यांसाठी वर्षाला दहा पिरिएड्स लिव्ह म्हणजेच मासिक पाळीच्या सुट्ट्या देण्याचा निर्णय घेताल आहे. कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष दिपेंदर गोयल यांनी कर्मचाऱ्यांना यासंदर्भातील इमेल पाठवून घोषणा केली आहे. शनिवारी कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना, “पिरिएड लिव्हसाठी अर्ज करताना लाज वाटण्यासारखं काहीच नाहीय. माझे पिरिएड्स सुरु आहेत मला सुट्टी हवी आहे असं तुम्ही इंटरनल ग्रुपवर किंवा इमेलवर मोकळेपणे यासंदर्भात सांगितलं पाहिजे,” अशा शब्दांमध्ये गोयल यांनी कर्मचाऱ्यांना या सुट्ट्या घेताना अवघडून जाण्यासारखं काहीच नसल्याचे म्हटले आहे. रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
“पुरुषांसाठी एक सांगू इच्छितो की आपल्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांची मासिक पाळी सुरु आहे सांगताना अवघडल्यासारखे वाटू नये. हा आयुष्याचा एक भाग आहे. या दिवसांमध्ये महिलांना काय काय त्रास सहन करावा लागतो याचा आपल्याला पूर्णपणे अंदाज बांधता येत नाही. मात्र जेव्हा त्या मला या काळात आराम करायला हवा असं म्हणतात तेव्हा आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. मासिक पाळीच्या काळामध्ये पोटात दुखण्याची समस्या अनेक महिलांसाठी खूप त्रासदायक असते याची मला कल्पना आहे. त्यामुळेच झोमॅटोमध्ये आपल्याला एकत्र काम करण्याची संस्कृती निर्माण करायची असेल तर त्यांना या काळात अधिक आधार आणि पाठींबा देण्याची गरज आहे,” असं गोयल यांनी इमेलमध्ये म्हटलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार झोमॅटोच्या नव्या नियमांप्रमाणे प्रत्येक मासिक पाळीसाठी महिला कर्मचारी एक सुट्टी घेऊ शकतात. देशातील अनेक भागांमध्ये मासिक पाळीसंदर्भात अजूनही मोकळेपणे बोललं जात नसलं तरी झोमॅटोसारख्या कंपनीने अशाप्रकारे पुढाकर घेणे हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे इतर कंपन्याही अशाप्रकारे विचार करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मासिक पाळीसाठी या सुट्ट्या देण्यात आल्या असल्याने त्या इतर कामांसाठी वापरु नयेत असंही कंपनीने म्हटलं आहे. “या सुट्ट्यांचा अपमान करु नका. तुम्ही उरलेली काम करण्यासाठी या सुट्ट्या वापरु नका. तुम्ही स्वत:ची काळजी घ्या. तुमचे आरोग्य, खाण्यापिण्याच्या सवयी यावर सकारात्मक परिणाम घडावा ज्यामधून तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित रहावे यासाठी या सुट्ट्या वापरा,” असंही गोयल यांनी म्हटलं आहे.
२००८ साली गुरुग्राममध्ये झोमॅटोची स्थापना झाली आहे. ही कंपनी देशातील सर्वात यशस्वी स्टार्टअपपैकी एक ओळखली जाते. या कंपनीमध्ये पाच हजार कर्मचारी काम करतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 8:51 am