डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टीकेला सामोरं जावं लागणाऱ्या ऑनलाइन फूड ऑर्डर कंपनी झोमॅटोने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. झोमॅटोने ऑर्डर करण्यात आलेल्या पदार्थांना पॅक करण्यासाठी टॅम्पर प्रूफ टेप आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एकदा ऑर्डर पॅकेटमध्ये टाकल्यानंतर त्याच्यासोबत छेडछाड करणं शक्य होणार नाही.

नुकताच सोशल मीडियावर मदुराई येथील एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय ऑर्डर केलेले पदार्थ पॅकेटमधून बाहेर काढून खाताना दिसत आहे. इतकंच नाही तर खाऊन झाल्यावर ते पुन्हा पॅक करुन त्या पॅकेटमध्ये ठेवतो. ग्राहकाला ही बाब कळू नये यासाठी आपल्याकडील असलेल्या टेपने पॅकेट पुन्हा पॅकदेखील करुन ठेवतो.

झोमॅटोने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. ‘यापुढे ग्राहकाच्या ऑर्डसोबत छेडछाड होई नये यासाठी आणि अशा घटना पुन्हा होऊ नयेत याकरिता आम्ही टॅम्पर प्रूफ टेप आणत आहोत. याशिवायदेखील अन्य पर्याय आम्ही अवलंबत आहोत’, अशी माहिती झोमॅटोने दिली आहे.

अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत असंही झोमॅटोने सांगितलं आहे. ही अत्यंत दुर्देवी आणि दुर्मिळ घटना असल्याचंही झोमॅटोने म्हटलं आहे. दरम्यान कंपनीने कारवाई करत व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या डिलिव्हरी बॉयला कामावरुन काढून टाकलं आहे. या घटनेमुळे आमची प्रशिक्षण आणि प्रक्रिया अजून मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे अशी माहिती झोमॅटोने दिली आहे.