तृतीयपंथी म्हटलं की आजही अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. कायद्याने या समाजाला किती हक्क किंवा अधिकार दिले तरीदेखील समाजातील लोक त्यांच्याकडे तुच्छतेने पाहतात. त्यामुळे आजही हा वर्ग अवहेलना सहन करताना दिसतो. परंतु, मनात जिद्द असेल तर कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करता येते हे याच समाजातील एका व्यक्तीने दाखवून दिलं आहे. अथक परिश्रम आणि जिद्द यांच्या जोरावर झोया खान हिची कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) विभागात निवड झाली आहे. विशेष म्हणजे सीएससीमध्ये दाखल होणारी ही देशातील पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच सीएससी विभागात जोयाची निवड झाली असून या विभागात काम करणारी ती पहिली ट्रान्सजेंडर ठरली आहे. विशेष म्हणजे ही माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरच्या माध्यमातून देत तिचं अभिनंदन केलं आहे.

“गुजरातमधील बडोदा जिल्ह्यात कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये ऑपरेटर असलेली झोया खान ही पहिली तृतीयपंथी व्यक्ती आहे. ती टेलिमेडिसिन कन्सलल्टंट म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. तृतीयपंथी समुदायाला डिजिटल साक्षर बनवण्यात हातभार लावावा आणि त्यांच्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध करून द्याव्यात हे तिचं ध्येय आहे’, असं ट्विट रविशंकर प्रसाद यांनी केलं आहे.

झोया खान बडोदामध्ये एलजीबीटी समुदायाशी निगडीत असून तिचा सामाजिक कार्यात मोठा सक्रिय सहभाग आहे. अशाच एका सामाजिक कार्यक्रमात जोया आणि सीएससीचे डिस्ट्रीक मॅनेजर आसिफ खान यांची भेट झाली. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर आसिफ खान यांनी जोयाला सीएससीमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि या विभागाच्या कामाचं स्वरुप समजावून सांगितलं. त्यानंतर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर जोयाने या विभागात टेलिमेडिसिन कन्सलल्टंट या पदावर रुजू झाली आहे.

एससीएस विभागात आयुष्मान योजनेप्रमाणे कार्य केलं जातं. सामान्यांपर्यंत सरकारी योजना आणि त्यांचे महत्त्व पोहचविण्याचं काम केलं जात असून या कामाचं स्वरुप समजल्यानंतर झोया लगेच काम करण्यास तयार झाली.