West Bengal Tea Stall: चहा या शब्दात काही वेगळीच जादू आहे. भारतासारख्या देशात चहा हे फक्त पेय नाही. तर ते निमित्त आहे. निमित्त लोकांनी एकत्र जमण्याचं, गप्पा मारण्याचं. मग तो सकाळचा वाफाळता चहा असो किंवा मग दुपार किंवा सायंकाळचा चहा असो. चहामुळे फक्त मनच नाही तर आपलं सामाजिक वातावरणही प्रफुल्लित होत असतं. चहाशी निगडित लाखो कथा, किस्से भारतात प्रचलित असतील. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही चहाशी घनिष्ठ संबंध आहेत. आज आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त भारतातील एका आगळ्या वेगळ्या चहाच्या दुकानाविषयी माहिती घेऊ. या दुकानात एकही पगारी कर्मचारी नाही, तरी १०० वर्षांपासून ते दुकान सुरू आहे.

कोलाकातापासून अवघ्या ३० किमी अंतरावर असलेल्या सेरमपूर येथील शहराच्या जुन्या भागात नरेश शोम टी शॉप हे चहाचे दुकान शतकभरापासून प्रेम आणि विश्वासावर सुरू आहे. या दुकानाचे खरे मालक अशोक चक्रवर्ती हे रोज सकाळी दुकानाचा टाळा उघडतात आणि आपल्या कामाला निघून जातात. त्यानंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत परिसरातील निवृत्त झालेले लोक, स्थानिकांचा गट या दुकानाचा ताबा घेतात.

स्वयंसेवक म्हणून चहाचं दुकान चालविणारी ही वयाने ज्येष्ठ असलेली मंडळी चहा तयार करतात. दुकानातील सर्व काही काम स्वच्छेने चालतं. चहा बनवून तयार ठेवला जातो. ग्राहक स्वतःच्या हाताने चहा ओतून घेतात. स्वयंसेवक दुकानाची स्वच्छता ठेवतात आणि सर्व व्यवहारही पाहतात. एका अलिखित सामंजस्यातून चहाचा गाडा सुरू राहतो.

सेरमपूरमधील हे दुकान पश्चिम बंगालसह जगभरात चर्चेचा विषय ठरलेले आहे. अनेक यूट्यूबर्स मंडळीनी याठिकाणचे व्हिडीओ केलेले आहेत. हे चहाचे दुकान नुसते चहाची तलफ भागविणारे ठिकाण नसून तो एक अड्डा बनलेला आहे. जिथे सर्व वयोगटातील लोक एकत्र येऊन गप्पा मारतात. कहाण्या सांगतात. चर्चा झडतात आणि हास्यविनोद करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे शतकभरापासून सदर दुकान ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू असूनही आतापर्यंत थकबाकीची वेळ आलेली नाही. आज जगभरात आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा होत असताना कोलकातामधील हे सर्वात जुने चहाचे दुकान आपले वेगळेपण टिकवून आहे.