King Cobra Rescue Shocking Video: साप किंवा अजगर समोर पाहताच भल्याभल्यांना घाम फुटतो. यात जगभरात विषारी सापांच्या अनेक प्रजाती आढळतात, ज्यातील सर्वात धोकादायक आणि विषारी प्रजाती म्हणजे ‘किंग कोब्रा’. या सापाच्या एका दंशाने काही मिनिटांत माणसाचा मृत्यू होऊ शकतो, म्हणूनच जंगलातील मोठे प्राणीदेखील त्याच्यापासून चार हात लांबच राहतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका महाकाय किंग कोब्राचा थरारक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यातील सापाचा भलामोठा आकार पाहूनच तुमचा थरकाप उडेल. पण, एक सर्प मित्र आपल्या जीवाची पर्वा न करता, मोठ्या हिमतीने झुडपात लपलेल्या या किंग कोब्राचे रेस्क्यू केले आहे.
नेपाळच्या रौतहट जिल्ह्यात ही थरारक घटना घडली आहे. ज्याचा अंगावर काटा आणणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो. येथे एका निवासी वस्तीजवळ एक महाकाय किंग कोब्रा झुडपात लपला होता. या विशालकाय सापाला पाहून स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. यानंतर प्रसिद्ध सर्पमित्र (स्नेक रेस्क्यू एक्सपर्ट) दीपक नेपाळ आपल्या टीमसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत या सापाला सुरक्षित पकडून जंगलात मुक्त केले.
व्हिडिओमध्ये साधारण १२ ते १४ फूट लांबीचा किंग कोब्रा लोकवस्तीजवळ वावरताना दिसत आहे. एवढ्या मोठ्या विषारी सापाला पाहताच परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ प्रसिद्ध सर्पमित्र दीपक नेपाळ यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.
माहिती मिळताच दीपक नेपाळ आपल्या सहकाऱ्यांसह काही वेळातच तिथे पोहोचले. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, किंग कोब्रा वारंवार आपला फणा काढून हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, रेस्क्यू टीमने अत्यंत संयम, खबरदारी आणि अनुभवाच्या जोरावर त्याला शिताफीने नियंत्रणात आणले. अखेर या सापाला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितपणे घनदाट जंगलात सोडण्यात आले.
या थरारक रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, नेटकरी दीपक नेपाळ आणि त्यांच्या टीमच्या धैर्याचे कौतुक करत आहेत. जर वेळेत रेस्क्यू ऑपरेशन झाले नसते, तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.
किंग कोब्रा किती धोकादायक असतो?
किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब आणि अत्यंत विषारी साप मानला जातो. त्याची लांबी १८ फुटांपर्यंत असू शकते. तज्ज्ञांच्या मते, किंग कोब्राच्या एका दंशामध्ये इतके विष असते की, एकाच वेळी अनेक लोकांचा जीव जाऊ शकतो. असे असले तरी, किंग कोब्रा विनाकारण मानवावर कधीही हल्ला करत नाही. जेव्हा त्याला स्वतःला धोका जाणवतो किंवा कोणी त्याच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच तो आक्रमक होतो.
किंग कोब्रा दिसल्यास काय करावे?
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, जर कुठेही किंग कोब्रा किंवा कोणताही विषारी साप आढळल्यास, त्याला स्वतः पकडण्याचा किंवा तिथून पळवून लावण्याचा प्रयत्न करू नये. सापापासून सुरक्षित अंतर ठेवून तात्काळ स्थानिक वन विभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांना पाचारण करावे. यामुळे मानवी जीव आणि वन्यजीव दोघांचीही सुरक्षा सुनिश्चित होते.
दीपक नेपाळ कोण आहेत?
दीपक नेपाळ हे नेपाळमधील एक नामांकित स्नेक रेस्क्यू एक्सपर्ट (सर्पमित्र) आहेत. ते अनेकदा धोकादायक आणि विषारी सापांना जीवदान दिल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर असे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत, ज्यांना लाखो लोकांनी पाहिले आहे.
