Shocking Crocodile Incident Video: काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ५९ वर्षीय व्यावसायिकाचा शोध सुरू होता… पण जे समोर आलं, ते ऐकून अंगावर काटा येईल. शोधमोहीम चालू असतानाच नदीकाठावर दिसलेली एक प्रचंड मगर संशयाच्या भोवऱ्यात सापडली… आणि पुढे जे घडलं, ते अक्षरशः थरारक होतं.
माहितीनुसार, पुराच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेलेल्या गॅब्रिएल बटिस्टा नावाच्या हॉटेलमालकाचा मागमूस लागत नव्हता. कोमाटी नदी (Komati River) मगरींसाठी कुप्रसिद्ध असल्याने सुरुवातीपासूनच अधिकाऱ्यांना भीती होती की, त्यांच्यावर हल्ला झाला असावा. त्यामुळे शोध पथकाने नदी परिसरात बारकाईने हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली.
अचानक एका ठिकाणी एक विशाल मगर दिसली… ड्रोन व हेलिकॉप्टरचा आवाज असूनही ती जवळपास हलत नव्हती आणि तिच्या हालचाली इतरांपेक्षा वेगळ्या होत्या. तिचे शरीर असामान्यरीत्या फुगल्याचे दिसत होते आणि ते पाहून काहीतरी गंभीर घडले असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आला. बटिस्टा यांच्या शोधमोहिमेदरम्यान अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याची परवानगी मिळताच त्यांनी त्या मगरीला ठार मारून तपास करण्याचा मोठा निर्णय घेतला. मात्र, ही कारवाई सोपी नव्हती. त्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक योजना आखून, त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात आली.
हेलिकॉप्टरच्या मदतीने एका पोलिस अधिकाऱ्याला थेट त्या मगरीजवळ उतरवण्यात आले. त्याने जीव धोक्यात घालून मगरीच्या तोंडाजवळ उतरून तिला दोरी आणि पट्ट्यांच्या साह्याने बांधले. त्या क्षणी आजूबाजूला इतर मगरीही फिरत होत्या… त्या वेळचा प्रत्येक क्षण धोकादायक होता.
त्यानंतर जवळपास १५ फूट लांब आणि तब्बल १००० पाउंड वजनाची ती मगर हेलिकॉप्टरच्या साह्याने हवेत उचलून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आली. पुढे जे समोर आलं, ते अधिकच धक्कादायक होतं.
मगरीची तपासणी करताना तिच्या पोटात दोन वेगळे हात, बरगडीचा काही भाग आणि मांसाचे तुकडे, असे मानवी अवशेष आढळले. हाताच्या एका बोटात सापडलेली अंगठी त्या बेपत्ता व्यावसायिकाची असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, याबाबत अद्याप फॉरेन्सिक तपास सुरू आहे.
इतकेच नव्हे, तर त्या मगरीच्या पोटात तब्बल सहा जोड शूजही सापडले. हे शूज नेमके कोणाचे आहेत, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाने आणखी गूढ निर्माण केले आहे.
या संपूर्ण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे बेपत्ता व्यक्तीचा थरारक शेवट; तर दुसरीकडे मगरीच्या पोटात सापडलेले इतर पुरावे हे सगळे एखाद्या चित्रपटातील प्रसंगांसारखे वाटत आहे.
येथे पाहा व्हिडीओ
ही संपूर्ण थरारक घटना दक्षिण आफ्रिकेतील एका नदीत घडल्याची माहिती समोर आली आहे.
