scorecardresearch

आई ओरडते म्हणून १५ वर्षीय मुलगी प्रियकरासोबत घर सोडून पळून गेली; नागपूरमधील धक्कादायक घटना

या मुलीची आई एकल माता असून ती एका लग्नाच्या हॉलवर काम करुन आपल्या दोन मुलींचं संगोपन करते

Girlfriend Boyfriend
पाच दिवस शोध घेतल्यानंतर पोलिसांच्या हाती लागले दोघे (प्रातिनिधिक फोटो सौजन्य सोशल मीडियावरुन साभार)

आई ओरडते म्हणून एक १५ वर्षीय मुलगी आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची विचित्र घटना नागपूरमधील जरीपटका येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं असून शुक्रवारी पोलिसांना पाच दिवसांच्या शोध मोहिमेनंतर ही मुलगी सुखरुप सापडली अन् तिच्या पालकांचा जीव भांड्यात पडला.

१३ जून रोजी हुंडकेश्वर पोलीस स्थानकामध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणी पुढे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही मुलगी १२ जून रोजी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती. आईने घालून दिलेले निर्बंध जुगारुन ही मुलगी पालकांच्या न कळत घरातून पळून गेली. या मुलीला पळून जाण्यासाठी तिच्या २० वर्षीय प्रियकराने प्रोत्साहन दिल्याची माहिती तपासात समोर आली असून पोलीसांनी या प्रकरणी आता या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. सध्या हा तरुण तुरुंगात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा या अल्पवयीन मुलीला घेऊन त्याच्या नातेवाईकाकडे गेला. त्यानंतर या दोघांनी भाडेतत्वावर एक खोली घेतली. दोघांनीही जरीपटकामधील एका मंदिरात लग्न केल्याची माहितीही पोलिसांनी दिलीय. हुंडेश्वर पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक कविता इसारकर यांनी वेगवगेळ्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले. या मुलीच्या आईच्या फोनवरुन करण्यात आलेले सर्व फोन कॉल्स तपासून पाहण्यात आले. सीबीआयकडून नियुक्ती करण्यात आलेल्या इसारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला एकल माता (सिंगल मदर) असून ती एका लग्नाच्या हॉलवर काम करुन आपल्या दोन मुलींचं संगोपन करते.

“तिच्या आईच्या फोनवरुन आम्ही तीन क्रमांकांचा शोध घेतला. ज्यांच्याबद्दल आम्हाला संशय वाटला. सीसीटीव्हीचे फुटेज सुद्धा उपलब्ध होते. मात्र प्रकरणाचा छडा लावण्याइतकी त्यांची मदत होणार नव्हती,” असं त्या म्हणाल्या. मुलगी बेपत्ता होण्याआधी संपर्कात असलेल्या तीन मुख्य व्यक्तींची चौकशी करण्यात आली. “आम्ही या तिघांचेही फोटो मिळवले. नंतर शक्यतांच्या आधारावर आम्ही एका दुचाकीची नंबर प्लेट फोटोमध्ये दिसून आल्याच्या आधारे तिघांपैकी एकजण आरोपी असल्याचा अंदाज बांधत तपास सुरु ठेवला. या तरुणाने स्वत:चं सीमकार्ड नष्ट केलं होतं. मात्र आईशी बोलण्यासाठी त्याने एका नातेवाईकाचा फोन वापरला होता. आम्ही तातडीने त्याच्या आधारे या मुलाच्या आईचा शोध घेतला आणि त्यांच्याकडे त्यांच्या मुलाच्या हितासाठी हे प्रकरण सोडवायला मदत करा अशी गळ घातली. मुलाची आई आणि त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने आम्ही या दोघांना ताब्यात घेतलं,” असं इसारकर यांनी सांगितल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-06-2022 at 11:49 IST