India’s Best Selling Electric Scooter: भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ झपाट्याने वाढताना दिसत आहे. वाढती पेट्रोलची किंमत, कमी खर्चात प्रवास आणि पर्यावरणपूरक पर्याय यामुळे अनेकजण आता इलेक्ट्रिक स्कूटरकडे वळत आहेत. विशेषतः शहरांमध्ये रोजच्या प्रवासासाठी इलेक्ट्रिक स्कूटर्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचदरम्यान एका लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरने विक्रीच्या बाबतीत मोठा विक्रम केला असून सध्या ऑटो मार्केटमध्ये तिची जोरदार चर्चा सुरू आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर आता तब्बल ७ लाखांहून अधिक ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही वर्षांत या स्कूटरने विक्रीचा मोठा टप्पा पार करत इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

१५३ किलोमीटर रेंजमुळे ग्राहकांची पहिली पसंती

आजच्या काळात ग्राहक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना सर्वात आधी रेंजकडे लक्ष देतात, कारण वारंवार चार्जिंगची झंझट कुणालाही नको असते. या स्कूटरमध्ये तब्बल १५१ ते १५३ किलोमीटरपर्यंतची रेंज मिळत असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात तिच्याकडे आकर्षित होत आहेत.
यामध्ये २.५ kWh ते ३.५ kWh पर्यंतचे लिथियम-आयन बॅटरी पर्याय दिले गेले आहेत. टॉप व्हेरिएंटमध्ये दमदार रेंजसोबत स्मूथ राइडिंग अनुभव मिळतो. शहरातील ट्रॅफिक असो किंवा रोजचा ऑफिस प्रवास, ही स्कूटर उत्तम पर्याय मानली जात आहे.

फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल “पैसे वसूल!”

या स्कूटरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. TFT डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन, म्युझिक कंट्रोल, रिव्हर्स मोड, ओव्हरस्पीड अलर्ट आणि अँटी-थेफ्ट सिस्टमसारखे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत.
काही व्हेरिएंट्समध्ये ‘Eco’ आणि ‘Sport’ असे राइड मोड्सही मिळतात, त्यामुळे गरजेनुसार परफॉर्मन्स निवडण्याचा पर्याय ग्राहकांना मिळतो. याशिवाय रिव्हर्स मोडमुळे पार्किंग करताना मोठी मदत होते. हिल होल्ड असिस्टसारख्या फीचरमुळे चढावावर स्कूटर मागे घसरण्याचा धोका कमी होतो.

डिझाइनमध्ये क्लासिक लूक, पण फीचर्स पूर्ण मॉडर्न

या इलेक्ट्रिक स्कूटरचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे तिचा आकर्षक रेट्रो-मॉडर्न लूक. क्लासिक डिझाइनसोबत आधुनिक टच दिल्यामुळे तरुणांसोबतच फॅमिली ग्राहकांनाही ही स्कूटर आवडत आहे. मजबूत मेटल बॉडी, प्रीमियम फिनिश आणि आकर्षक रंग पर्यायांमुळे तिचा रस्त्यावर वेगळाच रुबाब दिसतो. स्कूटरमध्ये ३५ लिटरचं मोठं अंडर-सीट स्टोरेज देण्यात आलं आहे, त्यामुळे हेल्मेट किंवा इतर सामान ठेवणं सोपं होतं.

विक्रीत मोठी झेप

या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री मागील वर्षांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये या स्कूटरच्या जवळपास ३ लाख दुचाकींची विक्री झाली आहे. ग्राहकांचा वाढता विश्वास आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढलेला कल, यामुळे कंपनीला मोठा फायदा झाला आहे.

विशेष म्हणजे, एकूण विक्रीपैकी जवळपास ७९ टक्के विक्री मागील दोन वर्षांतच झाली आहे. यावरून भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती मागणी स्पष्ट दिसून येते.

शेवटी जाणून घ्या… कोणती आहे ही स्कूटर?

इतक्या भन्नाट फीचर्स, दमदार रेंज आणि प्रचंड विक्रीमुळे चर्चेत आलेली ही इलेक्ट्रिक स्कूटर म्हणजे Bajaj Chetak Electric आहे.
₹८९,५०० पासून सुरू होणारी किंमत आणि प्रीमियम फीचर्समुळे ही स्कूटर सध्या भारतीय ग्राहकांची पहिली पसंती बनताना दिसत आहे.