आजवर सोन्या चांदीची, गाडी बंगल्याची गेला बाजार शेत जमिनीची चोरी आपण ऐकून असाल पण जोधपूर पोलीस ठाण्यात एक अशी तक्रार दाखल झाली आहे की ती ऐकून तुम्ही सुद्धा चकित व्हाल. जोधपूर पोलीस सध्या गाढवांचा शोध घेण्यात व्यस्थ आहेत ही गाढवं काही साधी नसून एका एकाची किंमत हजारो रुपयात आहे. हे नेमकं प्रकरण काय चला तर पाहुयात..

प्राप्त माहितीनुसार, जोधपूर गावातील भंवरलाल देवासी यांच्या घरातील अंगणातून १६ गाढवांची चोरी झाली आहे. रात्री घरासमोरील अंगणात बांधून ठेवलेली १६ गाढवे सकाळची गायब असल्याने त्यांचे मालक भंवरलाल यांनी थेट पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार नोंदवली आहे.जोधपूर जिल्ह्यातील जैतीवास गावी हा प्रकार घडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गाढवांचे मालक भंवरलाल यांनी तीन गावकऱ्यांवर गाढव चोरल्याचा आरोप केला आहे यात गावकरी गुलाब राम लक्ष्मण राम व पुनाराम भाट यांच्यावर त्यांनी मुख्य संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी सांगितले की, भंवर लाल देवासी यांच्या तक्रारीनुसार संशयित गाढवचोरांची चौकशी केली जात आहे.

Video: बाळासाठी ‘त्या’ मातेने भल्या मोठ्या कोब्राशी दिला लढा; पाहून तुम्हीही कराल कौतुक

हा सगळा प्रकार पाहता ही काय सोन्याची गाढवं होती का असा प्रश्न आपल्याला पडला असेलच पण खरं सांगायचं तर जैतिवास गावात गाढवांना खूप मोल आहे. या गावात भाट समाजातील लोक माती वाहून नेण्याचा व्यवसाय करतात ज्यासाठी हे गाढव त्यांना खूप कामी येतात. भंवरलाल म्हणतात की माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा या गाढवांमुळेच होत आहे.

जोधपूर सह आसपासच्या परिसरात गाढवांची संख्या कमी होत असल्याने यांच्या किंमती तुफान वाढत आहेत. जोधपूर जिल्ह्यात एका गाढवाची किंमत १५,००० ते २५,००० रुपयांपर्यंत आहे. हे वधारलेले दर पाहता गाढवांची चोरी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.