Toddler Swallowed Metal Wire Cake Decoration Video : सर्वच पालक आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त अनेक प्लॅन्स करत असतात. अगदी डेकोरेशनपासून खाण्यापिण्यापर्यंत आणि कोणाकोणाला आमंत्रण द्यायचं, याचं सर्व प्लॅनिंग महिनाभर आधीच सुरू असतं. यात मुलांच्या आवडीनुसार केकची ऑर्डर दिली जाते. अशाच प्रकारे एका आई-वडिलांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाचे प्लॅनिंग केले होते. पण याच वाढदिवसाचा केक त्यांच्या चिमुरड्याच्या जीवावर बेतला. हे वाचून तुम्हाला धक्का बसेल, पण या केकमुळेच चिमुरड्याला वाढदिवसाच्या पार्टीतून थेट रुग्णालयात न्यावे लागले. नेमकं घडलं काय? जाणून घेऊया…

एका आईने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिने वाढदिवसाच्या केकसाठी वापरण्यात येणाऱ्या सजावटीशी संबंधित एक अत्यंत धोकादायक प्रकार सांगितला आहे. तिने सांगितले की, वाढदिवसाच्या दिवशी तिच्या लहान मुलाने नकळतपणे केकमधील लोखंडी तार (मेटल वायर) गिळली. पण ही मेटल वायर केकमध्ये आली कशी? समजून घेऊया…

वाढदिवसाचा आनंद अचानक संकटात बदलला

व्हिडीओमध्ये चिमुरड्याची आई नेमकं काय घडलं ते सांगत आहे. तिने सांगितले की, त्यांच्या कुटुंबाने मुलाच्या वाढदिवसानिमित्त ‘बॉलिंग थीम’ असलेला एक सुंदर केक मागवला होता. या केकच्या सजावटीसाठी लोखंडी तारेचा (मेटल वायर) वापर करण्यात आला होता, ज्याची माहिती बेकरीकडून कुटुंबाला देण्यात आली नव्हती.

केक खात असताना तिच्या २ वर्षांच्या मुलाने नकळतपणे ती लोखंडी तार गिळली. यानंतर कुटुंबाच्या आनंदाचे रूपांतर भीतीमध्ये झाले आणि त्यांनी मुलाला तातडीने रुग्णालयात नेले. तो संपूर्ण दिवस कुटुंबाने प्रचंड घबराट आणि काळजीमध्ये घालवला.

एक्स-रे मध्ये दिसल्या लोखंडी वस्तू

रुग्णालयात मुलाचा एक्स-रे (X-Ray) करण्यात आला, तेव्हा डॉक्टरांना त्याच्या पोटात लोखंडाचे दोन तुकडे अडकल्याचे दिसले. परिस्थिती अत्यंत गंभीर वाटत होती, तरीही डॉक्टरांच्या देखरेखीखाली मुलाच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवण्यात आले.

शस्त्रक्रियेशिवाय बाहेर पडले तुकडे

सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, काही वेळानंतर ते दोन्ही लोखंडी तुकडे कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय (सर्जरी) मुलाच्या शरीरातून नैसर्गिकरित्या बाहेर पडले. सुमारे ४८ तासांनंतर कुटुंबाने सुटकेचा श्वास सोडला.

आईने दिला सर्व पालकांना सतर्कतेचा इशारा

या घटनेनंतर आईने सर्व पालकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तिने आवाहन केले आहे की, केक किंवा इतर कोणत्याही सजावटीच्या वस्तूंमध्ये वापरलेले साहित्य खाण्यायोग्य (Edible) आहे की नाही, याची नेहमी चौकशी करा. अनेकदा सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या तारा, प्लास्टिक किंवा टूथपिक्स लहान मुलांसाठी अत्यंत जीवघेण्या ठरू शकतात.

सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. मुलांच्या वाढदिवसाच्या केकवर केली जाणारी सजावट कधीकधी किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेतून समोर आले आहे. काही युजर्सनी मुलगा सुरक्षित असल्याबद्दल देवाचे आभार मानले, तर काहींनी सांगितले की लहान मुलांसाठी केक निवडताना अतिरिक्त काळजी घेतली पाहिजे. तसेच, बेकरी चालकांनी ग्राहकांशी पारदर्शकता ठेवून अशा वस्तूंबाबत आधीच कल्पना द्यायला हवी, अशी मागणीही अनेकांनी केली आहे.