Bad Habits That Are Secretly Sabotaging Your Success : आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या ‘नीतीशास्त्र’ या ग्रंथात जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी अनेक शिकवण दिल्या आहेत. त्यामध्ये कोणत्या वाईट सवयी तुमच्यासाठी घटक ठरू शकतात, याबद्दलही माहिती देण्यात आली आहे. पण, काही सवयी तुमच्या प्रगतीच्या देखील शत्रू ठरू शकतात. याबद्दलही त्यांनी ग्रंथात म्हंटले आहे. चला, त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात…

आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणालाही न मागता सल्ला देऊ नये. जर तुम्हाला ही सवय असेल, तर तुमच्यासमोर सगळे तुमच्या गोष्टींना ‘हो हो म्हणतील, तुमचे ऐकतील. पण, तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतील. कारण – जी मंडळी न मागता सल्ला देतात त्यांच्यात अनेकदा अधीरता दिसून येते, ज्यामुळे तुम्ही करिअरमध्ये मागे पडतात. म्हणून, तुम्ही ही सवय बदलली पाहिजे.

जर तुम्ही सतत स्वतःची स्तुती करत असाल आणि इतर कोणालाही स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानत नसाल, तर आचार्य चाणक्य यांच्या मते, हे शहाणपण नसून मूर्खपणा आहे. जे सतत स्वतःची स्तुती करतात, त्यांच्या जवळ कोणीही जात नाही. इतर लोक अशा लोकांवर विश्वास ठेवत नाहीत आणि त्यांना मदत करण्यासाठी पुढे येत नाहीत. यामुळे त्यांना प्रगती साधण्यात अडचणी येऊ शकतात.

जे लोक स्वतःला खूप ज्ञानी समजतात आणि इतरांना कमी लेखतात, त्यांनाही सहज प्रगती होत नाही. अशा लोकांचे एक वेगळेच जग असते, ज्यात ते केवळ त्यांना ज्ञानी समजणाऱ्यांनाच प्रवेश देतात. आचार्य चाणक्य आपल्या ज्ञानाची बढाई मारण्याची सवयदेखील चुकीची मानतात.

आचार्य चाणक्य म्हणतात की, इतरांचा अपमान करण्याची किंवा त्यांच्यावर टीका करण्याची सवयसुद्धा चांगली नाही. इतरांचा अपमान केल्याने जगाच्या नजरेत तुमची मानहानी होऊ शकते. हे दुष्कृत्य तुमच्या प्रगतीमध्ये एक मोठा अडथळा ठरू शकते.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)