scorecardresearch

Zombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती

48500 Years Old Zombie Virus: मानवाला ठाऊक असलेल्या सर्वात जुन्या विषाणूंपेक्षाही हा १८ हजार ५०० वर्ष अधिक पुरातन

Zombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती
Zombie Virus found in Serbia Russia: ४८५०० वर्ष जुना झोम्बी व्हायरस (फोटो – रॉयटर्स आणि लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Zombie Virus in Serbia Russia: रशियामधील एका संशोधनादरम्यान फ्रेंच वैज्ञानिकांना ४८ हजार वर्षांपूर्वीचा एक विषाणू सापडला आहे. रशियामधील एका गोठलेल्या तळ्यामध्ये हा विषाणू सापडला असल्याची माहिती समोर आली आहे. ‘न्यू यॉर्क पोस्ट’च्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार या विषाणूला ‘झोम्बी व्हायरस’ असं म्हटलं आहे. या विषाणूमुळे पुन्हा एकदा करोनापेक्षाही अधिक भयंकर आणि मोठी साथ पसरण्याची भीतीही या वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरामधून प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राने ज्या अभ्यासाचा आधारे ही बातमी दिली आहे त्या अभ्यासासंदर्भातील सविस्तर संशोधन अद्याप प्रकाशित झालेलं नाही. प्रकाशनापूर्वीचं काम सुरु असून लवकरच हे संशोधन सार्वजनिक केलं जाणार आहे. “हा पुरातन विषाणू सापडल्याने भविष्यात वनस्पती, प्राणी आणि मानवासाठी परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते,” असं या ‘व्हायरल’ माहितीमध्ये म्हटलं आहे. प्रथामिक अहवालांनुसार वातावरण बदलांमुळे बर्फाच्या खाली असलेली उत्तर गोलार्धामधील अनेक ठिकाणी पहिल्यांदाच मानवाला संशोधनानिमित्त पोहोचता आलं आहे. पहिल्यांदाच या गोठलेल्या अवस्थेत असलेल्या विषाणूंशी मानवाशी संबंध आला आहे. मात्र वातावरण बदलांमुळे ‘मागील हजारो वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेल्या या विषाणूंच्या माध्यमातून काही जैविक पदार्थांचं उत्सर्जन होण्याची शक्यता आहे,’ असा अंदाज व्यक्त केला जातोय. यामध्ये प्राणघातक विषाणूंचाही समावेश असू शकतो.

“या जैविक घटकांमध्ये पेशी असलेले अतिसूक्ष्म जीव तसेच विषाणूंचा समावेश असू शकतो,” असाही संशोधकांचा अंदाज आहे. वैज्ञानिकांना हे झॉम्बी विषाणू सैबेरियन पठारावरील बर्फाच्या चादरीखालील गोठलेल्या तळ्यामध्ये आढळले. साथीचे रोग पसरण्यासाठी कारणीभूत असलेल्या आणि आतापर्यंत ठाऊक असलेला हा विषाणू ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा असल्याचा अंदाज आहे. अनेकांना बाधित करणारा हा विषाणू संसर्गाच्या लाटेदरम्यान या बर्फाच्या चादरी खाली हजारो वर्षांपासून दाबला गेला. हा आता सध्या मानवाला ठाऊक असलेल्या सर्वात जुन्या विषाणूंपैकी एक ठरला आहे. यापूर्वी २०१३ मध्ये सैबिरियातच ३० हजार वर्षांपूर्वीच्या विषाणूचा शोध लागला होता.

‘सायन्स अलर्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार या संशोधनादरम्यान १३ वेगवेगळ्या विषाणूंचा शोध लागला असून प्रत्येकाची रचना ही वेगवेगळी आहे. रशियामधील याकुतिया येथील युकेची आल्स नावाच्या तळ्यामध्ये यापैकी मुख्य विषाणूचा शोध लागला आहे. बर्फाखाली गोठलेल्या अवस्थेत असलेल्या सैबेरियन कोल्ह्याच्या केसांमधून तसेच आतड्यांमधून इतर विषाणूंचे अवशेष वैज्ञानिकांना मिळाले आहेत.

नक्की वाचा >> विश्लेषण: FIFA विश्वचषकावर करोनापेक्षाही घातक अशा ‘कॅमल फ्लू’चं संकट, WHO चा इशारा; मात्र या आजाराची लक्षणं काय?

हे काही हजार दशकांपूर्वीचे विषाणू संसर्गास कारणीभूत ठरु शकतात. त्यामुळेच ते मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. करोनासारख्या विषाणूंच्या संसर्गाच्या लाटा यापुढे सामान्यपणे अनेकदा येतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या विषाणूंच्या माध्यमातून उत्सर्जित होणाऱ्या पदार्थांमुळे बर्फ वेगाने वितळतो आणि त्याचं रुपांतर कार्बन डायऑक्साइड, मिथेनमध्ये होतं. त्यामुळे हरितवायूचं अधिक प्रमाणात उत्सर्जन होतं असंही वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.

या वृत्तांकनामधील माहितीनुसार हा नवीन विषाणू सापडणं ही केवळ एक सुरुवात असून असे इतरही अनेक विषाणू आता सापडतील असा अंदाज आहे. या अनोळखी विषाणूवर प्रकाश, उष्णता, ऑक्सिजनसारख्या गोष्टींबरोबरच इतर नैसर्गिक गोष्टींचा काय परिणाम होतो यावर अधिक संशोधन आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 12:01 IST

संबंधित बातम्या