Chanakya Niti Friendship Advice : चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनी सांगितले की, व्यक्तीची खरी ओळख केवळ त्याच्या बोलण्यातून नव्हे, तर एखादी परिस्थिती आल्यावर दिसून येते. चाणक्यांचा असा विश्वास होता की, ज्याप्रमाणे सोन्याची शुद्धता घासून, कापून, तापवून आणि ठोकून तपासली जाते, त्याचप्रमाणे कठीण काळ, जबाबदाऱ्या आणि वागणूक माणसाचे खरे स्वरूप समोर यायला मदत करते. आयुष्यात अशा काही परिस्थिती येतात. जेव्हा खरा मित्र कोण आणि केवळ नावापुरता कोण, हे स्पष्ट व्हायला मदत होते…
१. कठीण काळ
चांगल्या काळात प्रत्येकजण तुम्हाला साथ देतो. पण, खरी परीक्षा कठीण काळात सुरु होते. जेव्हा एखादी व्यक्ती संकटात असते, तेव्हा तिचा खरा मित्र कोण आहे हे स्पष्ट होते. जे कठीण काळात तुमच्या पाठीशी उभे राहतात, तेच खरे विश्वासू असतात. बहुतेक लोक अशा वेळी स्वतःला दूर ठेवतात आणि मग त्यांचा खरा स्वभाव समोर येतो.
२. त्याग
एखाद्याची खरी ओळख त्याच्या त्यागातूनही प्रकट होते. जी व्यक्ती इतरांच्या सुख-समाधानासाठी स्वतःचे हित बाजूला ठेवू शकते, ती व्यक्ती चांगली असते. दुसरीकडे, जे फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतात ते गरजेच्या वेळी सर्वात आधी बाजूला होतात.
३. पैसा आणि सत्ता
काही लोक सामान्य परिस्थितीत खूप नम्र दिसतात. पण, जसे त्यांच्याकडे संपत्ती, पद किंवा सत्ता येते तेव्हा त्यांचे वर्तन बदलते. असे लोक इतरांना कमी लेखू लागतात. जो व्यक्ती यश मिळवल्यानंतरही शांत आणि नम्र राहतो तोच खऱ्या अर्थाने चांगला माणूस असतो.
४. वर्तन
एखादी व्यक्ती इतरांशी कसे वागते यावरूनही तिची ओळख उघड होते. जो व्यक्ती गरीब, गरजू, दुर्बळ लोकांशीही आदराने वागतो. त्याला सुसंस्कृत मानले जाते. अहंकारी आणि इतरांना कमी लेखणाऱ्या लोकांपासून दूर राहणे चांगले असते.
५. जबाबदार व्यक्ती
कृती आणि जबाबदारीच्या महत्त्वावरही भर दिला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला जबाबदारी दिली जाते. तेव्हा त्याचे खरे गुण प्रकट होतात. जो व्यक्ती एखादे काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पूर्ण करतो. तो विश्वासार्ह मानला जातो. पण, जे निष्काळजी असतात त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही.
