scorecardresearch

धक्कादायक! पोलिसांनीच केली सहकारी कर्मचाऱ्याला लाठ्यांनी मारहाण, घटनेचा Video होतोय व्हायरल

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने या प्रकरणी ५ पोलिसांचे निलंबन केलं आहे

धक्कादायक! पोलिसांनीच केली सहकारी कर्मचाऱ्याला लाठ्यांनी मारहाण, घटनेचा Video होतोय व्हायरल
काही पोलिसांनी मिळून आपल्याच सहकारी पोलिसाला लाठ्यांनी मारहाण केली आहे. (Photo : Twitter)

उत्तर प्रदेशमधून दिवसेंदिवस एकापेक्षा एक गुन्हेगारीच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आज तेथील पोलिसांना त्यांच्याजवळ असणारी रायफल लोड करता येत नसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अशातच आता उत्तर प्रदेश पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये काही पोलिसांनी मिळून आपल्याच सहकाऱ्याला लाठ्यांनी मारहान केल्याचं दिसतं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासन सक्रिय झाले असून या प्रकरणी ५ पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. हा व्हिडिओ रायबरेली जिल्हा कारागृहातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही पाहा- रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका बिघडली, दुचाकीस्वारांनी १२ किमी ढकलत हॉस्पिटलपर्यंत नेली, पाहा Video

कारागृहात तैनात असलेल्या पोलिसांमध्ये काही कारणावरुन किरकोळ वाद झाला, त्यानंतर काही पोलिसांनी मिळून त्यांच्याच एका सहकाऱ्याला बेदम मारहाण केल्याचं व्हिडीओत दिसतं आहे. ही मारहाण जिल्हा कारागृहात कोणाचं वर्चस्व राहणार यावरुन झाली असल्याचं सांगण्यात येतं आहे. याच कारणावरुन पोलिसांमध्ये वादावादी झाली. यानंतर पाच हवालदारांनी एका कॉन्स्टेबलला बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्या पाच हवालदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचे निलंबन करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.

हेही पाहा- दोन ट्रकच्यामध्ये सापडली कार अन पुढल्याच क्षणी…, ‘या’ अपघाताचा Video पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल

मारहाण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने सांगितलं की, ‘माझा पती जिल्हा कारागृहात काम करतो जिल्हा कारागृहात कैदी रक्षक म्हणून ते कार्यरत झाले होते. याच कारागृहात काम करणाऱ्या इतर पोलिसांनी आपापसातील वादातून पतीला काठ्यांनी बेदम मारहाण केली.’ तर जिल्हा कारागृहात तैनात असलेल्या जेलरचे म्हणणे आहे की, किरकोळ कारणावरून पोलिसांमध्ये वादावादी झाली. पीडितेच्या तक्रारीवरून पाच जणांवर कारवाई करण्यात येत आहे.

याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कळवण्यात आल्याचे जेलरने सांगितले. तर हे प्रकरण कारागृहात अवैध पदार्थांच्या पुरवठ्याशी संबंधित असल्याच्या काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 20:54 IST

संबंधित बातम्या