64-year-old intern joins Mumbai start-up : Gen Z नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. इंटरनेट, स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि डिजिटल तंत्रज्ञानासह मोठी झालेली पिढी नेहमीच काहीतरी असं करते ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते. अशाच एका Gen Zच्या कंपनीने अशी कृती केली आहे जी पाहून अनेकांना धक्का बसला तर अनेकांचे मन जिंकले.
मुंबईतील स्टार्टअपमधील ६४ वर्षीय इंटर्न आणि ‘हॉबी ट्राईब’चे संस्थापक जोशुआ सॅलिन्स यांनी आपल्या फॉलोअर्सना या ज्येष्ठ इंटर्नची ओळख करून देणारा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. मुंबईस्थित एका स्टार्टअपच्या संस्थापकाने ६४ वर्षीय इंटर्नला कामावर ठेवणे हा त्यांच्या कंपनीसाठी सर्वात फायदेशीर निर्णयांपैकी एक कसा ठरला, हे सांगितल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्या या कृतीचे कौतुक केले आहे.
हॉबी ट्राईबचे संस्थापक जोशुआ सॅलिन्स यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या फॉलोअर्सना त्या ज्येष्ठ इंटर्नची ओळख करून दिली. व्हिडीओच्या सुरुवात, “POV: तुमच्या स्टार्टअपमध्ये एक ६४ वर्षीय इंटर्न आहे,” या कॅप्शनने होते आणि त्यानंतर तो इंटर्न आपल्या डेस्कवर पूर्ण एकाग्रतेने लॅपटॉपवर टायपिंग करत कामात मग्न असल्याचे दाखवले जाते.
जसा व्हिडीओ पुढे जातो,त्यात दिसते की ६४ वर्षीय इंटर्न आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या सहकाऱ्यांबरोबर काम करत आहे, चर्चांमध्ये सहभाग घेत आणि आपल्या टीमबरोबर आपले मत मांडत आहे. कॅप्शनपुढे स्पष्ट केले की,”त्यांचा अनेक वर्षांचा व्यवसाय उभारण्याचा आणि वाढवण्याचा अनुभव खूप उपयोगी ठरला. तसेच कंपनीची संस्कृती(company’s culture) घडवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचेही सांगण्यात आले.
“आम्ही नुकतेच कार्यालयात एका ६४ वर्षीय इंटर्नला घेतले आहे, आणि @hobbytribe_official येथे आम्ही घेतलेला हा सर्वोत्तम निर्णय आहे,” असे सॅलिन्स यांनी पोस्टसोबत लिहिले.
नेटकऱ्यांनी केले तोंडभरून कौतूक
६४ वर्षीय इंटर्नला नोकरी देण्याच्या या असामान्य निर्णयामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली, आणि एकाने विचारले, “तो इंटर्न का आहे?”
कमेंट्समध्ये उत्तर देताना, सॅलिन्सने स्पष्ट केले की त्या व्यक्तीला घरी वेळ घालवण्याऐवजी व्यावसायिकदृष्ट्या सक्रिय राहायचे होते. “कारण त्याला काम करत राहायचे होते आणि फक्त घरी बसायचे नव्हते. तसेच, त्याच्याकडे देण्यासारखे खूप ज्ञान आहे, त्यामुळे खूप मदत होते!” असे त्यांनी उत्तर दिले.
अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्या इंटर्नच्या उत्साहाचे कौतुक केले आणि सुचवले की,”तो गरजेपोटी नव्हे, तर सतत शिकत राहण्याच्या, योगदान देण्याच्या आणि आपले कौशल्य इतरांना देण्याच्या इच्छेने प्रेरित होता.”
इतरांनी गंमतीने म्हटले की, जर त्याने कधी एखादा शॉर्टकट किंवा जीवनाबद्दलचा सल्ला दिला, तर त्याच्या अनेक दशकांच्या अनुभवामुळे लोकांनी कदाचित त्याच्यावर विश्वास ठेवावा.
एकाने कमेंटमध्ये लिहिले, “खरं सांगायचं तर, माझ्या आणि त्याच्यात, तो खूपच जास्त कूल इंटर्न आहे.” दुसऱ्याने म्हटले, “मला खरंच त्याच्यासोबत राहायला आणि त्या प्रक्रियेत खूप काही शिकायला आवडेल…. आयुष्यभराचा एक अनमोल अनुभव.”
या कथेमुळे अनेकांना रॉबर्ट डी नीरो आणि ॲन हॅथवे अभिनीत २०१५ सालच्या ‘द इंटर्न’ या चित्रपटाची आठवण झाली. हा चित्रपट एका ७० वर्षीय माणसाची गोष्ट सांगतो, जो एका वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअपमध्ये वरिष्ठ इंटर्न म्हणून रुजू होतो आणि अखेरीस कंपनीच्या तरुण संस्थापकाचा विश्वासू मार्गदर्शक बनतो. अनेक वापरकर्त्यांनी टिप्पणी केली की सॅलिन्सचा व्हिडिओ म्हणजे “‘द इंटर्न’ चित्रपट, पण खऱ्या आयुष्यात घडल्यासारखा” वाटला.
