Viral Kerala Women: पदपथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असतात. मात्र भारतातील सर्वच राज्यात फुटपाथ अर्थात पदपथांची दुरवस्था दिसून येते. फेरीवाले आणि दुकानांचे अतिक्रमण, व्यसनी लोकांचा अड्डा किंवा दुचाकी पार्किंग तर कुठे गाड्यांची वर्दळ यामुळे सामान्यांना पदपथांऐवजी रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन पायपीट करावी लागत असते. यंत्रणाही यावर सक्षण पावले उचलताना दिसत नाही. मात्र केरळच्या कोझिकोड येथे एका ७३ वर्षीय महिलेने पथपथावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवून एक आदर्श घालून दाखवला आहे. या घटनेचा व्हिडीओ देशभरात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसले?
प्रभावती अम्मा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. कोझिकोडमधील एका रस्त्यावर त्या फुटपाथवरून जात असताना समोरून दुचाकीस्वार येतो. रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्यामुळे दुचाकीस्वार फुटपाथवरून जाण्याचा प्रयत्न करतो. पण प्रभावती त्याचा मार्ग रोखून धरतात. दुचाकीस्वार अनेकदा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याला प्रभावती अम्मा जाऊ देत नाही. शेवटी दुचाकीस्वार मागे वळून पुन्हा रस्त्याने निमूटपणे निघून जातो.
द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रभावती म्हणाल्या की, लोक जेव्हा सिव्हिक सेन्स धाब्यावर बसवून वागतात, तेव्हा तेव्हा मी त्यांना अशीच अडवत असते. मी फुटपाथवरून चालत असताना समोर दुचाकीवरून एक इसम आला. मी त्याला मागे जायला सांगितले. तरी तो जायला तयार नव्हता. मग मी माझा मोबाइल काढून त्याचा फोटो घ्यायला लागले. तसा तो मागे गेला.
प्रभावती या एकट्याच राहतात. त्या कम्युनिस्ट विचारांमध्ये वाढलेल्या आहेत. तसेच भारत स्काऊट्स अँड गाईड्समध्ये असल्यामुळे त्यांना अशा विषयांसाठी काम करण्यात रस आहे. प्रभावती यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले असून त्यांनी केरळमधील विविध वसतीगृहांमध्ये वॉर्डन म्हणून काम केलेले आहे.
माझे आई-वडील कम्युनिस्ट होते आणि मीही तरूण असताना याच चळवळीशी जोडले गेले होते. केरळ महिला फेडरेशनची कोझिकोड तालुका कार्यालय अधीक्षक म्हणून मी काम पाहिले होते. यानंतर या संघटनेचे नाव ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमन्स असोसिएशन असे झाले होते. पण १९९० पासून मी चळवळीत सक्रीय नाही.
