सामान्यपणे म्हतारपण आलं की शरीर साथ देत नाही आणि शारीरिक हलचालींवर मर्यादा देतात. अनेकदा गुडघेदुखी, हातपाय दुखणं आणि हाडांच्या समस्या वयस्कर व्यक्तींना जाणवतात. थंडीच्या दिवसात तर त्वचा कोरडी पडण्यापासून ते हुडहुडी भरण्यापर्यंतच्या अनेक समस्या वयस्करच काय मध्यवयीन लोकांनाही हैराण करतात. मात्र रशियामधील एक ७९ वर्षांच्या आजी सर्वसामान्यांहून थोड्या नाही बऱ्याच वेगळ्या आहेत. कारण या आजी ८० वर्षाच्या उंबरठ्यावर असतानाच चक्क बर्फात स्केटींग करतात आणि ते ही एकट्याच. आश्चर्याची बाब म्हणजे या प्रदेशातील हिवाळ्यातील तापमान हे उणे २४ पर्यंत असते. एवढ्या थंडीत या आजीबाई मस्तपैकी स्केटींगचा आनंद घेताना दिसतात.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ल्युबोव्ह मेरीखुडोव्ह असं या ७९ वर्षीय आजीबाईंचं नाव आहे. त्या रशियामधील लोकप्रिय लेक बिकालच्या किनारी राहतात. सध्या येथे हिवाळा असल्याने तलाव पूर्णपणे गोठलेलं आहे. त्यामुळे त्या या तलावावरच स्केटींग करत असतात. मला स्केटींग करायला मनापासून आवडतं. मला स्केटींग करताना खूप आनंद मिळतो, मज्जा येते असं ल्युबोव्ह सांगतात. मी एकटी स्केटींग करत या विस्तीर्ण तलावावर फेऱ्या मारत असते. मी रोज इथे येते. माझा पाळीव कुत्राही मी स्केटींग करताना माझ्या आजूबाजूने धावत असतो, असंही या आजीबाई आपल्या स्केटींगच्या रोजच्या वेळापत्रकासंदर्भात बोलताना सांगतात. ल्युबोव्ह या एकट्याच राहतात. त्या रोज गायी चरायला घेऊन जातानाही स्केटींगचे शूज घालूनच जातात. घरापासून बऱ्याच अंतरावर असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी गायी चरत असतात. त्यांना संध्याकाळी घरी घेऊन येतानाही मी स्केटींग करतच येते असं ल्युबोव्ह यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं.

विशेष म्हणजे ल्युबोव्ह या ७९ वर्षांच्या असल्या तरी त्या आजही त्यांच्या वडीलांनी त्यांच्यासाठी तयार केलेले खास स्केटींग शूज घालतात. हे शूज त्या सुतळीने बांधतात. हे शूज लाकडापासून बनवण्यात आलेले आहेत. सध्या ल्युबोव्ह यांचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असून या आजींच्या स्केटींग स्कील पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी या आजींच्या उत्साहाचं कौतुक केलं आहे.