Businessman Driving Uber At 86 For Supporting Girls Education: भारतीय उद्योजक नव शाह यांनी त्यांना फिजीमध्ये उबर राईड दरम्यान आलेला एक अनुभव शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, उबर राईड दरम्यान त्यांची एका अशा व्यक्तीबरोबर ओळख झाली ज्यांचे वय ८६ असून ते वार्षिक १४०० कोटी रुपयांचा (१७५ दशलक्ष डॉलर्सचा) व्यवसाय असलेल्या फिजी-भारतीय कंपनीचे मालक आहेत आणि तरीही ते उबर चालवतात. जेणेकरून त्यांना भारतातील मुलींच्या शिक्षणासाठी निधी देता येईल. सध्या या ८६ वर्षांच्या आजोबांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
प्रवासादरम्यान नव शाह यांनी त्या ८६ वर्षीय ड्रायव्हरशी गप्पा मारल्या आणि त्यांना विचारले, “तुम्ही तुमचे खर्च कसे भागवता?” या नम्र पण आत्मविश्वासू व्यक्तीने उत्तर दिले, “मी एक व्यावसायिक आहे आणि माझ्या कंपनीची वार्षिक उलाढाल १४०० कोटी रुपये (१७५ दशलक्ष डॉलर्स) आहे.” या उबर ड्रायव्हर असलेल्या आजोबांनी पुढे सांगितले की, ते गेल्या दशकापासून दरवर्षी २४ मुलींच्या शिक्षणासाठी निधी पुरवतात आणि याचा सर्व खर्च ते उबर चालवून मिळवलेल्या कमाईतून करतात. त्यांच्या कृतीचे सध्या मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
“मला तीन मुली आहेत. मी त्यांना चांगले शिक्षण दिले. आता त्या चांगल्या ठिकाणी काम करत आहेत. म्हणून मी विचार केला, मी इतर मुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास का मदत करू नये?”, असे हे ८६ वर्षीय उबर चालवणारे आजोबा हसत-हसत म्हणाले. याबाबत नव शाह यांनी इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सांगितले.
या संभाषणादरम्यान या ८६ वर्षीय उबर चालवणाऱ्या आजोबांनी नव शाह यांना त्यांच्या उद्योगांची माहिती दिली. ते म्हणाले, “आमची १३ दागिन्यांची दुकाने, सहा रेस्टॉरंट्स, एक स्थानिक वृत्तपत्र आणि चार सुपरमार्केट आहेत.” यावर नव शाह यांनी विचारले की, हे सर्व त्यांनी स्वतः सुरू केले आहे का? तेव्हा उबर चालवणाऱ्या या आजोबांनी अभिमानाने उत्तर दिले, “माझ्या वडिलांनी १९२९ मध्ये त्यांच्याकडे असलेल्या पाच पौंडांपासून सुरुवात केली होती.”
नव शाह यांनी हा अनुभव सांगण्यासाठी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “एक व्यक्ती ज्याने सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. संपत्ती, व्यवसाय आणि वारसा असूनही त्यांचे जीवन दयाळूपणा आणि उद्दिष्टावर आधारित आहे. त्यांनी मला आठवण करून दिली की, खरे यश तुम्ही किती कमाई करता यावर अवलंबून नाही, तर ते तुम्ही या प्रवासात किती लोकांना याच मार्गावर येण्यासाठी मदत करता यावर अवलंबून आहे.”
