अमेरिकेतल्या मिशिगनमधील एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमधील १२ वर्षांच्या मुलाच्या कृत्याने अनेकांना धक्का बसला आहे. कारण- या मुलाने असे काही केले आहे की, ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. हो! कारण- त्याने चक्क एका बांधकाम साइटवरून एक कन्स्ट्रक्शन ट्रक पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळच्या सुमारास कन्स्ट्रक्शन ट्रक चोरी गेल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी गेले. यावेळी त्यांना हा मुलगा ब्रूक्स स्ट्रीटवर हेडलाइट न लावता वेगाने फोर्कलिफ्ट (कन्स्ट्रक्शन ट्रक) चालवत असल्याचे आढळले. पोलिसांनी मुलाचा ताशी १५ ते २० किलोमीटर वेगाने पाठलाग केला. यावेळी या मुलाने जॉर्जटाउन बुलेवर्ड येथे पार्क केलेल्या जवळपास १० गाड्यांना धडक दिली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
मुलाचा पाठलाग केल्याचा व्हिडीओ पोलिसांनी यूट्युबवर शेअर केला आहे. पोलिसांकडून पाठलाग केला जात असताना मुलगा चालवीत असलेल्या फोर्कलिफ्टने अनेक वाहनांना धडक दिल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. इतकेच नव्हे, तर विजेवर चालणाऱ्या दिव्याच्या खांबांनाही त्याने धडक दिल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. एवढे होऊनही मुलाने कन्स्ट्रक्शन ट्रक थांबवला नाही.
अखेर मुलाने गॉटफ्रेडसन रोड परिसरात ट्रक थांबवला. त्यानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. या संपूर्ण घटनेत कोणालाही इजा झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. एन आर्बर पोलिस विभाग या धक्कादायक व भयानक अशा घटनेचा अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी या १२ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान या मुलाने कॅबमध्ये लपवलेल्या चावीचा वापर करून, फोर्कलिफ्ट वाहन उघडल्याचे समोर आले.