सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे आणि आश्चर्यकारक व्हिडीओ आपणाला पाहायला मिळतात. जे पाहून कधीकधी आपणाला डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो केरळमधील कोझिकोडमधील दक्षिण समुद्रकिनाऱ्यावरचा आहे. या व्हिडीओमध्ये समुद्रकिनाऱ्यावर एक भलामोठा मेलेला व्हेल मासा पाण्यातून वाहत आल्याचं पाहायला मिळत आहे. ओंमनोरमानुसार, शनिवारी सकाळी १० च्या सुमारास स्थानिक मच्छिमारांनी सर्वात आधी या माशाचा मृतदेह पाहिला. एका मच्छिमाराने वृत्तसंस्थेला सांगितले की, हा मेलेला मासा पाहिल्यानंतर तो दोन दिवसांहून जास्त दिवस मेल्याची शक्यता आहे. तसेच या व्हेलचे शरीर १५ मीटर म्हणजेच जवळपास ५० फूट लांब असल्याचंही सांगण्यात येत आहे.
कोझिकोड कॉर्पोरेशनचे प्रभारी आरोग्य अधिकारी प्रमोद यांनी ओंमनोरमाला सांगितले की, या माशाचा मृत्यू कशाने झाला हे तपासण्यासाठी त्याचे समुद्रकिनाऱ्यावर पोस्टमार्टम केले जाईल आणि नंतर प्रोटोकॉलनुसार त्याला खोल खड्ड्यात पुरलं जाईल. ” या व्हेल माशाच्या मृतदेहाचा व्हिडिओ @nizamudheen नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शनिवारी शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये स्थानिक या माशाला पाहण्यासाठी गर्दी केल्याचं दिसत आहे. तर अनेकजण या माशाबरोबर सेल्फी काढत असल्याचंही पाहायला मिळत आहे.




या माशाच्या व्हिडीओवर कमेंट करताना एका वापरकर्त्याने लिहिलं, “कृपया त्या मेलेल्या व्हेलच्या जवळ जाऊ नका.. कारण त्याला स्फोट होऊ शकतो ज्यामुळे आसपासच्या लोकांना इजा होऊ शकते.” तर मेलेल्या व्हेलच्या शरीराचा स्फोट होऊ शकतो जेव्हा त्याच्या शरीरात गॅस तयार होतो. या आधीही अशा माशांच्या शरीराचे स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये २९ जानेवारी २००४ रोजी तैवानमधील एका शहरात व्हेल माशाचा स्फोट झाला. तर ऑगस्ट २०२१ मध्ये, यूएसए मधील टोमलेस बे जवळ कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवर मेलेल्या व्हेलच्या शरीराचा स्फोट झाला होता ज्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.