आजकाल अनेक लोक सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी स्वत:चे वेगवेगळे रील बनवून ते फेसबुक, ट्वीटर किंवा इन्स्टाग्रामवर अपलोड करत असतात. शिवाय इतरांपेक्षा काहीतरी वेगळं रील बनवण्याच्या नादात अनेकदा लोक जीवघेणा स्टंट करायलाही मागेपुढे पाहात नाहीत. पण अशा धोकादायक स्टंटमुळे अनेकांना आपला जीवदेखील गमावावा लागतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडीओत रील बनवण्याच्या नादात एका मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जहांगीराबादचा येथील रहिवासी फरमान आपल्या ३ मित्रांसह मिरवणूक पाहण्यासाठी जात होता. यावेळी ते सर्वजण एका रेल्वे क्रॉसिंगजवळ थांबले होते. यावेळी फरमान मागचा पुढचा काहीही विचार न करता रील बनवण्यासाठी थेट रेल्वे रुळावर जाऊन उभा राहिला. दुर्देवाने त्याला मागून येणारी रेल्वे दिसली नाही. त्यामुळे मागून आलेली रेल्वे त्याला जोरदार धडक देते.
धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल –
या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फरमान रेल्वेच्या चाकाखाली गेल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडीओत फरमान रेल्वे रुळाच्या दिशेने जाताना दिसत आहे. यावेळी त्याने कानात इअरबड घातल्याचं दिसत आहे. कानात इअरबड घातल्यामुळेच त्याला रेल्वेचा हॉर्न ऐकू आला नाही आणि तो रुळाच्या जवळ जातो.
फरमानचा जागीच मृत्यू –
या घटनेत फरमानचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे एका रीलसाठी आपला जीव धोक्यात घालणं किती महागात पडू शकतं याचं उदाहरण समोर आल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A boy lost his life at the sound of the reel a video of a heartbreaking accident caused by a speeding train has gone viral jap