आदर्श स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. रयतेच्या सुखासाठी आपल्या निवडक धाडसी मावळ्यांना घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभाव मानणारे होते. अन्यायी जुलमी आणि धार्मिक अत्याचार करणाऱ्या मुस्लीम राजवटीविरुद्ध महाराज लढले आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदू धर्माचे रक्षण करताना त्यांनी कधीही इतर धर्मांचा द्वेष केला नाही. स्त्रियांना नेहमी सन्मानाने वागवले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी आपल्या सैनिकांना दिली. अशा धार्मिक धोरणासंबंधी उदारमतवादी शिवाजी महाराजांची गुणवैशिष्ट्ये ही प्रत्येकांनी आदर्श घ्यावीत अशीच आहेत. शिवाजी महाराजांचे हे विचार आजही तरुणाईला प्रेरित करणारे आहेत.

अनेक शिवभक्त तरुण आजही गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. दरम्यान, अशाच एका शिवभक्त तरुणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणाच्या हातात एक फलक आहे. या फलकाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

इन्स्टाग्रामवर nimajvivek नावाच्या अकाउंटवर ही पोस्ट करण्यात आली आहे. “ज्योतिर्लिंग १२ नाहीत तर १४ आहेत. तेरावे ज्योतिर्लिंग छत्रपती शिवरायांची समाधी आणि चौदावे ज्योतिर्लिंग श्री शंभुराजे यांची समाधी. कारण हे दोन पिता-पुत्र नसते तर १२ ज्योतिर्लिंग शिल्लक राहिले नसते”, असा मजकूर त्या फलकावर लिहिलेला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक शिवभक्तांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तरुणाच्या मतावर सहमती दर्शवत लिहिले की, “या समाधीस्थळी नतमस्तक झाल्याशिवाय हिंदू धर्माचे पांग फिटत नाही.” एकाने कमेंटमध्ये लिहिले की, “अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा. शिवपुत्र धर्मवीर श्री संभाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा.”

१२ ज्योतिर्लिंगांना आहे भारतात विशेष महत्त्व

भारतात १२ ज्योतिर्लिंगांना खूप महत्त्व आहे. सोरटी सोमनाथ, महांकालेश्वर, श्रीशलि, ओंकारमांधता, भीमाशंकर, परळी वैजनाथ, रामेश्वर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, औंढ्या नागनाथ, केदारनाथ, घृष्णेश्वर अशी १२ ज्योतिर्लिंगे आहेत. भगवान शंकाराची पूजा करणारे अनेक भाविक या १२ ज्योतिर्लिंगांचे आवर्जून दर्शन घेतात. दरवर्षी मोठ्या संख्येने यात्रेकरू या ठिकाणांना भेट देतात.