ऑनलाईन वस्तू खरेदी करणे ग्राहकांची पहिली पसंती ठरते आहे. किराणा माल पासून ते अगदी घरातील छोट्या-छोट्या वस्तू देखील प्रत्येकजण ऑनलाईन ऑर्डर करताना दिसतात आणि या ऑर्डर आपल्या घरापर्यंत डिलिव्हरी बॉय पोहचवतात. तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने पार्सल दिल्यानंतर महिलेच्या घराबाहेरील बूट चोरले ; जे सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाले आहे.
कॅप्टन मोनिका खन्ना यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ही घटना दिल्लीतील आहे. २३ नोव्हेंबर रोजी एक ब्लिंकिट डिलिव्हरी बॉय कॅप्टन मोनिका खन्ना यांच्या घरी रात्री ८ वाजता किराणामाल देण्यासाठी आला होता. पार्सल दिल्यानंतर डिलिव्हरी बॉय लिफ्टमधून निघून गेला. पण, काही वेळात तो पुन्हा याच लिफ्टने महिलेच्या घराजवळ पुन्हा आला. तसेच डिलिव्हरी बॉयने आपल्या जॅकेटची चैन उघडली आणि दरवाजाबाहेर ठेवलेलं बूट उचलून गुपचूप तेथून पळ काढला.
पोस्ट नक्की बघा :
दिल्लीत नुकत्याच घडलेल्या या घटनेनं कॅप्टन मोनिका खन्ना यांची चिंता वाढवली आहे. कारण, जेव्हा महिलेने या संदर्भात ब्लिंकिंट कंपनीतील अधिकाऱ्याकडे तक्रार केली. तेव्हा महिलेला तिच्या सुरक्षेबद्दल आश्वासन देण्यात आले. तर सुद्धा रात्री १० च्या सुमारास हा डिलिव्हरी बॉय पुन्हा महिलेच्या घरासमोर उभं राहून दरवाजावरील बेल वाजवताना दिसला आणि त्याच्या हातात एक पिशवी होती ; हे सुद्धा सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाले होते. या सर्व गोष्टींमुळे तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याचे ठरवले.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @flywithmonica या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती युजरने कॅप्शनमध्ये लिहिली आहे आणि हा व्हिडीओ शेअर केला आहे. दिल्ली सारख्या शहरात रात्री घडलेल्या या घटनेनं महिलेच्या मनात एक भीती निर्माण झाली आणि तिने ही गोष्ट सोशल मीडियावर सगळ्यांबरोबर शेअर करण्याचे ठरवले.