रतन टाटांच्या प्रत्येक कृतीतून आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो याची जाणीव होते. अशातच रतन टाटांच्या आणखी एका कृतीने आता नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. रतन टाटांच्या मालकीच्या मुंबईतील सर्वात आलिशान ताज हॉटेलमध्ये गेल्यास सगळं सुंदर, भव्य, आरामदायी असे दृश्य दिसते. पण, ताज हॉटेलशी संबंधित एक वेगळं दृश्य आता पाहायला मिळत आहे. फाइव्ह स्टार हॉटेलच्या दरवाजासमोर निवांत झोपलेल्या श्वानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो त्याच हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या एका रुबी खान नावाच्या महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोवरून त्यांनी रतन टाटांसंबंधित एक सुंदर गोष्ट सांगितली आहे.

मुंबईतील आलिशान ताज हॉटेलच्या आवारात एक भटका श्वान झोपलेला दिसला, ज्याला पाहून रुबी खान थोड्या अवाक् झाल्या; कारण इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये अनेक बडे सेलिब्रिटी, राजकीय नेते येतात; अशा ठिकाणी एका भटक्या श्वानाचे वावरणे थोडे दिसताना वेगळे वाटत होते. मात्र, रतन टाटा यांनीच हॉटेलच्या आवारात येणाऱ्या प्राण्यांशी चांगले वागण्याच्या सक्त सूचना दिल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले, जे ऐकताच रुबी खानही अवाक् झाल्या. यानंतर त्यांनीही रतन टाटा यांच्यातील महानतेची प्रशंसा केली.

रुबी खाननेही याबाबत एक भली मोठी पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये भटक्या श्वानाला पाहून आश्चर्य वाटले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेतली. त्या माहितीनुसार, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तिला सांगितले की, तो जन्मापासून या हॉटेलचा एक भाग आहे. रतन टाटांनी स्वतः कडक सूचना दिल्या आहेत की, त्यांच्या हॉटेलच्या आवारात कोणी प्राणी आल्यास त्याला चांगली वागणूक द्यावी. या खास ठिकाणी श्वानाला सुरक्षित राहून शांततेने जगता येईल अशी जागा मिळाली आहे, हे पाहून तिलाही आनंद झाला.

त्यामुळे रतन टाटांच्या आदेशानुसार, हॉटेलच्या दरवाजात झोपलेल्या या भटक्या श्वानाला कोणीही हकलवत नाही; अशा रतन टाटांच्या मन जिंकणाऱ्या कृतीचे रुबी खाननेही कौतुक केले आहे.

या पोस्टमध्ये रुबी खान यांनी पुढे लिहिले की, “ताजमहाल हॉटेलमध्ये प्रतिष्ठित राजकीय व्यक्तींपासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींपर्यंत अनेक लोक येतात. त्यामुळे हॉटेल परिसर अगदी स्वच्छ, सुंदर आणि प्रतिमा जपणारा ठेवला जातो. अशा प्रतिष्ठित हॉटलेच्या प्रवेशद्वारालाही महत्त्व असते. पण, याच प्रवेशद्वारावर एक श्वान शांतपणे झोपला होता, बहुधा कोणाचेही त्याच्याकडे लक्ष गेले नसेल. खान पुढे म्हणाल्या की, त्यांनी हॉटेलमध्ये समावेशन, मानसिक सुरक्षितता आणि भावनिक बुद्धिमत्ता अनुभवली.

रुबी खान यांनी रतन टाटांकडे इशारा करत म्हटले की, “तुम्ही सर्वात यशस्वी उद्योजक होऊ शकता, परंतु तुम्ही सर्वांचा आदर करणे आणि आलिंगन देणे कधीही थांबवू नये.”

दारुच्या नशेत अपघात अन् रस्त्यावर स्पीकर लावून धिंगाणा; गोव्यात राडा घालणाऱ्या तरुणाचा VIDEO व्हायरल

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यावर युजर्सकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. हॉटेलनेही या विषयावर भाष्य केले. ताज हॉटेल्सने खान यांच्या पोस्टवर कमेंट्स करत लिहिले की, “हाय रुबी, ही गोष्ट शेअर केल्याबद्दल धन्यवाद. ताजमध्ये आम्ही सहानुभूती आणि समावेशाला महत्त्व देतो. हे सुनिश्चित करतो की, प्रत्येक पाहुण्याला घरी असल्यासारखा अनुभव येईल, तुमचे अनुभव खरोखरच आमच्या मूळ मूल्यांशी जुळतात.

दरम्यान, रतन टाटा अनेक सामाजिक कार्यात आघाडीवर असतात; अनेक सामाजिक कार्यातून त्यांचे प्राण्यांविषयीचे प्रेम दिसून येते. अनेकदा सोशल मीडियावर ते श्वानांबरोबरचे फोटो पोस्ट करत असतात. त्याचीच अनुभूती ताज हॉटेलच्या आवारातील श्वानाचा फोटो पाहिल्यानंतर येते, ज्याचे आता सोशल मीडियावरही कौतुक होत आहे.