scorecardresearch

“मी सुशिक्षित, माझे निर्णय…”; मुलीचं उत्तर ऐकून संतापले प्राध्यापक वडील, मुलीची गोळी झाडून हत्या केली अन्…

“मी शिकलेली आहे, माझा निर्णय स्वतः घेईन कारण मी माझ्या पायावर उभी आहे.”

Kasganj News
एका कॉलेजच्या प्राध्यापकाने आपल्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.(Photo : Social media, loksatta)

उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ती म्हणजे एका सरकारी कॉलेजच्या प्राध्यापकाने आपल्या शिक्षिका मुलीची गोळ्या झाडून हत्या केली आणि स्वतःही आत्महत्या केली आहे. मुलीने प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिच्या वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचचल्याची माहितीही समोर आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेबाबतची माहिती आजतक वृत्तसंस्थेने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले नरेंद्र सिंह यादव कासगंजच्या नगरिया येथील शेरवानी इंटर कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे लेक्चरर होते. नरेंद्र यादव यांच्याशिवाय त्यांची पत्नी शशी मुलगी जुही आणि एक मुलगा असे चौघे घरात राहत होते. तर नरेंद्र यादव यांचा मुलगा सध्या नोएडामध्ये दहावीची तयारी करत आहे. तर मुलगी जुही ही कासगंज जिल्ह्यातील मिर्झापूर प्राथमिक शाळेत शिक्षिका होती.

जुहीला आवडत्या मुलाशी करायचे होते लग्न –

जुहीला तिच्या मर्जीने लग्न करायचे होते. मात्र, तिच्या वडिलांना ही गोष्ट पटली नाही. त्यांनी जुहीला खूप समजावले पण ती आपल्या म्हणण्यावर ठाम होती. जुहीने तिच्या आईसमोर वडिलांना म्हणाली, “मी शिकलेली आहे, माझा निर्णय मी स्वतः घेईन कारण मी माझ्या पायावर उभी आहे.” मुलीने उलट उत्तर दिलेलं वडिलांना सहन झालं नाही. ते रागारागात आपल्या खोलीत गेले. कपाटातून परवानाधारक बंदूक बाहेर काढली आणि चक्क पोटच्या मुलीवर गोळीबार केला. यादरम्यान मुलीने गोळी अडवण्यासाठी बंदुकूवर हात ठेवला, पण गोळी तिच्या हातातून थेट छातीत घुसली.

वडिलांनीही केली आत्महत्या –

मुलीची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर वडिलांनी स्वतःच्या गळ्याला बंदूक लावली आणि ट्रिगर दाबल्यामुळे तेदेखील रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले. पती आणि मुलीची ही अवस्था पाहून जुहीची आईने आरडाओरडा सुरू केला, त्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी रक्तबंबाळ झालेल्या बाप-लेकीला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं.

फॉरेन्सिक टीम घटनास्थळी –

घटनेची माहिती मिळताच एसपी सौरभ दीक्षित पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळावरून पुरावे गोळा करून खून व आत्महत्येचे कशामुळे झाली याची कारणे जाणून घेतली. त्याचवेळी पोलिसांनी दोघांचेही मृतदेह रुग्णालयात नेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आणि नंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, नरेंद्र यादव यांची पत्नी शशी यांनी प्राथमिक चौकशीत सांगितले की, पती नरेंद्र यादव आणि मुलगी जुही यांच्यामध्ये कौटुंबिक वादातून किरकोळ भांडण झाले. वाद वाढल्यानंतर नरेंद्र यांना राग आला आणि त्यांनी कपाटातून बंदूक काढून आधी मुलीवर गोळी झाडली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 18:00 IST

संबंधित बातम्या