‘त्याग’ हा शब्द उच्चारताच सहसा डोळ्यांसमोर आई किंवा स्त्रीची प्रतिमा येते. पण याच समाजातील एका शांत, धीरगंभीर आणि खंबीर आधार देणाऱ्या पुरुषाचा त्याग मात्र बऱ्याचदा दुर्लक्षित होतो. पुरुष म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर कुटुंबाची सावली, जबाबदाऱ्यांचे ओझे पेलणारा खांदा आणि स्वप्नांना बळ देणारा अदृश्य आधार असतो.
स्वतःचे आनंद, आवडी-निवडी आणि आयुष्यही तो कुटुंबाच्या हास्यासाठी आनंदाने पणाला लावतो. सकाळी उन्हा-तान्हात राबण्यापासून ते रात्रीच्या शांततेत भविष्याची चिंता करण्यापर्यंत, त्याची संपूर्ण हयातच एका न बोलणाऱ्या त्यागाची गोष्ट असते. अशाच एका अव्यक्त संघर्षाची झलक दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
धावत्या लोकलमध्ये भेळ विकताना कसरत!
‘ghoomtachatora’ या कंटेंट क्रिएटरने लोकल ट्रेनमधला एक अत्यंत साधा, पण तितकाच मन हेलावणारा प्रसंग कॅमेऱ्यात टिपला आहे. व्हिडिओमध्ये एक सर्वसामान्य माणूस धावत्या लोकलच्या डब्यात भेळ विकताना दिसतोय.
लोकल ट्रेनमध्ये भेळ किंवा भजी विकणारे तसे रोजच दिसतात; पण या माणसाची धडपड काही वेगळीच आहे! ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हा माणूस डब्यात चक्क डान्स करतोय, लोकांचं मनोरंजन करतोय. हातातील स्टीलचा ग्लास एखाद्या जादूगारासारखा हवेत फिरवून गायब करतो, पुन्हा तोच ग्लास हातात पकडून गोल-गोल फिरवतो आणि डान्स करत-करत कागदाच्या पुड्यात भेळ भरून ग्राहकांच्या हातात देतो.
आसपासचे प्रवासी त्याच्याकडे कौतुकाने आणि आश्चर्याने पाहत आहेत. पण या मनोरंजनामागे एक शांत वेदना आणि अथांग संघर्ष दडलेला आहे… “एका पुरुषाचे हास्य आणि त्याची कसरत ही नेहमी त्याच्या कुटुंबाच्या पोटासाठी असते.”
“तो नाचतोय, लोकांचं मनोरंजन करतोय…”
व्हिडिओच्या कॅप्शनमधील शब्द थेट काळजाला भिडतात, “एक पुरुष आपल्या कुटुंबासाठी काहीही करू शकतो. ज्या गोष्टी करायला बहुतेकांचे पाय धजावणार नाहीत, त्या गोष्टी तो हसत-हसत करतोय. फक्त चार पैसे कमवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी! त्याच्या चेहऱ्यावरील या हास्यामागे कठोर परिश्रम, संघर्ष आणि अपार प्रेम दडलंय. आपल्या माणसांचं पोट भरलेलं आहे ना, हे पाहणं हीच एका पुरुषाची सर्वात मोठी ताकद असते!”
नेटकरी झाले भावूक; टोमणे मारणाऱ्यांना चोख उत्तर!
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांच्या भावनांचा बांध फुटला आहे. ईस्टर्न रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने कमेंट करत सांगितले, “मी या काकांना बंगालमध्ये सेल्दा-दत्तपुकुर लोकलमध्ये अनेकदा पाहिलंय. ते आपल्या कामात खरोखर खूप हुशार आणि मेहनती आहेत!”
नेटकऱ्यांनी लिहिले, “आज जे लोक पुरुषांच्या निष्ठेवर आणि मेहनतीवर प्रश्न उपस्थित करतात, त्यांनी कुटुंबासाठी स्वतःचं अस्तित्व पणाला लावणाऱ्या या पुरुषाचा संघर्ष आधी पहावा.”
काहींनी या काकांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक मागितला आहे, तर काहींनी हा व्हिडिओ नामांकित शो आणि कंटेंट क्रिएटर्सना टॅग करून या कलाकाराला मोठ्या मंचावर बोलावण्याची मागणी केली आहे.
लोकलच्या गर्दीत, त्या खडखडणाऱ्या रुळांवर स्वतःच्या कुटुंबाच्या सुखासाठी चाललेली ही सर्कस पाहून एकच गोष्ट पटते, ‘भाऊ,’ ‘बाप’ किंवा ‘पती’ म्हणून घरातल्या पुरुषाचे कष्ट आपण कधीच शब्दांत तोलू शकत नाही.
