Mumbai Lift Dog Attack Video : ‘पाळीव प्राणी’ हा अनेक लोकांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. एकीकडे प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारे आणि घरातील सदस्यासारखे प्रेम देणारे प्राणीमित्र आहेत; तर दुसरीकडे पाळीव प्राण्यांच्या वावरामुळे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत, स्वच्छतेबाबत आणि शांततेबाबत चिंतित असणारे नागरिक आहेत. पाळीव प्राण्यांचा मुद्दा निघाला या दोन गटांमध्ये नेहमीच वाद होतो. अर्थात माणूस म्हणून प्रत्येकाला प्राण्यांबद्दल सहानुभूती असणे आवश्यक आहे पण त्यांच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी इतरांना त्रास होणार नाही, कोणाला दुखापत होणार नाही, याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
पाळीव प्राण्यांना सोसायटीत फिरवण्यावरून होणारे वाद, लिफ्टमधील त्यांचे वावर, आणि प्राण्यांनी अचानक आक्रमक होऊन केलेल्या हल्ल्यांच्या ताज्या घटना, यामुळे पाळीव प्राण्यांचे मालक आणि इतर रहिवासी यांच्यात अनेकदा संघर्षाची ठिणगी पडताना दिसते. सोशल मीडियावर पुन्हा एकदा अशाच एका घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ एका लिफ्टमधील आहे जिथे एक पाळीव प्राणी तीन लहान मुलींवर अचानक हल्ला करतो. व्हिडीओ समोर आल्यानंतर, हा वाद फक्त प्राण्यांच्या हक्कांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो ‘पाळीव प्राण्यांच्या मालकांची जबाबदारी आणि इतरांची सुरक्षितता’ या कळीच्या मुद्द्याभोवती फिरत आहे.
मुंबईतील मालाड पश्चिम येथील एका उच्चभ्रू इमारतीच्या लिफ्टमध्ये एका पाळीव कुत्र्याने तीन लहान मुलींवर अचानक धावून गेल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. व्हिडीओ पाहून काळजाच धस्स होत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नक्की काय घडले?
ही घटना शुक्रवारी शेठ आयरीन टॉवरमध्ये घडली आणि इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये, एक महिला तिच्या पाळीव कुत्र्यासह लिफ्टमध्ये प्रवेश करताना दिसत आहे, तर आत आधीच तीन लहान मुली होत्या.
लिफ्टचे दरवाजे बंद होताच, तो कुत्रा अनपेक्षितपणे अस्वस्थ झाला आणि मुलींच्या दिशेने धावून वारंवार झडप घालू लागला, ज्यामुळे त्या मुली त्या घाबरल्या. लिफ्टमध्ये जागा नसल्याने त्यांना पळून जाणे देखील अवघड जात होते तरीही दोन मुली कशातरी बाहेर पळून गेल्या. पण तिसऱ्या मुलीला बाहेर पळून जाता नाही. त्यानंतर लिफ्टचे दार बंद झाले. दरम्यान, मालकीण कुत्र्याला मागे खेचून नियंत्रण मिळवण्याचे वारंवार प्रयत्न करताना दिसली आणि आत राहिलेली एक मुलगी कुत्र्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा लिफ्ट पुढच्या मजल्यावर पोहोचली आणि दरवाजे उघडले, तेव्हा त्या मुलीने पटकन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्याने तिच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण मालकीणबाईंनी ऐनवेळी त्याला मागे खेचले आणि परिस्थिती अधिक चिघळण्यापासून रोखली. सुदैवाने, कोणत्याही मुलीला गंभीर दुखापत झाली नाही.
अद्याप तक्रार दाखल नाही
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या न्यूज१८ च्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की कुत्र्याच्या मालकाकडे सर्व आवश्यक परवाने होते. या घटनेसंदर्भात कोणतीही औपचारिक तक्रार दाखल न झाल्याने कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
नेटकऱ्यांचा संताप
या व्हिडिओमुळे ऑनलाइन प्रतिक्रियांची लाट उसळली असून, अनेक सोशल मीडिया वापरकर्ते सार्वजनिक निवासी जागांमध्ये पाळीव प्राणी मालकांच्या जबाबदाऱ्यांवर चर्चा करत आहेत. अनेक लोकांनी सांगितले की,”मालकांनी गर्दीच्या लिफ्टमध्ये पाळीव प्राणी नेणे टाळावे, विशेषतः जर ते प्राणी अनोळखी लोकांमध्ये अस्वस्थ होत असतील.
एका वापरकर्त्याने लिहिले, “या प्रकरणात, मी त्या पाळीव कुत्र्याच्या मालकिणीची बाजू घेत आहे. किमान तिने कुत्र्याला बाहेर नेण्यापूर्वी त्याचा तोंड झाकले आहे. केवळ त्यामुळेच तो कुत्रा लोकांना चावू शकला नाही. अनेक कुत्र्यांच्या मालकांना अजूनही अशी मूलभूत जबाबदारी समजत नाही.”
दुसऱ्याने कमेंट केली, “या कुत्र्याची मालकीणीला कुत्र्याला जवळ कसे धरायचे हे माहित असायला हवे, विशेषतः जेव्हा तिला माहित आहे की,”तिचा कुत्रा लिफ्टसारख्या सार्वजनिक ठिकाणी इतर लोकांबरोबर कसा वागेल. तिने या कुत्र्याला घेऊन पुन्हा कधीही लिफ्टमध्ये जाऊ नये.”
तिसऱ्या वापरकर्त्याने पुढे म्हटले, “किमान तिने कुत्र्याला हाताळण्याचा प्रयत्न केला आणि तिने तिच्या कुत्र्याच्या तोंडावर जाळीदार संरक्षक आवरण (Muzzle) बांधले. कुत्रा मुलींना चावू शकला नसता, फक्त नखांचे ओरखडे शक्य आहेत. पण तरीही तो एक पिटबुल आहे, ज्यावर बंदी आहे.”
