एखादं अद्भूत दृश्य आपल्या कॅमेरात कैद करण्याची संधी कोणताही फोटोग्राफर सोडत नाही. फोटोग्राफर मॅथ्यू डिपललाही ती सोडायची नव्हती. म्हणूनच यॉस्मीत नॅशनल पार्क मधल्या उंच टेकडीवर तो पोहोचला. सूर्याची सोनेरी किरणं जेव्हा डोंगर माथ्यावर पडतात तेव्हा स्वर्गाहूनही सुंदर अशी ती पर्वत रांग दिसते हे, मॅथ्यूनं कधीतरी ऐकलं होतं. तेव्हा हाच क्षण त्याला आपल्या कॅमेरात कैद करायचा होता. या उत्सुकतेपोटी तो डोंगराच्या टोकावर पोहोचला. सुर्यकिरणात न्हाऊन निघालेली डोंगर दरी टिपण्यासाठी त्याची घाई सुरू होती.

मात्र ऐनवेळी एक जोडपं पलिकडील डोंगराच्या टोकावर पोहचलं. मावळत्या सूर्याच्या सोनेरी, तांबुस प्रकाशाच्या साक्षीनं आपल्या प्रेयसीला मागणी घालण्यासाठी तो गुडघ्यावर बसला. समोरचा अद्भूत निर्सगाविष्कार आपल्या कॅमेरात कैद करण्यात व्यग्र असलेल्या मॅथ्यूच्या कॅमेरानं त्या जोडप्यालाही आपल्या कॅमेरात कधी कैद केलं हे त्याचं त्यालाच कळलं नाही.

मात्र नंतर आपलं छायाचित्र हे स्वप्नवत सुंदर आलं असल्याचं मॅथ्यूला जाणवलं. ज्या जोडप्यामुळे हे छायाचित्र अधिक सुंदर झालं त्या जोडप्याचे आभार मानण्याचं मॅथ्यूनं ठरवलं. यासाठी त्यानं सोशल मीडियाचा आधारही घेतला. मात्र काही केल्या त्याला या फोटोतील जोडप्याचा शोध लागला नाही. मॅथ्यू बरोबर अनेकांनी फोटोतील जोडप्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही या फोटोतील जोडपं समोर आलं नाही. गेल्या दोन आठवड्यापासून मॅथ्यूसह जगभरातील जोडपे या फोटोतील जोडप्याचा शोध घेत आहे. या जोडप्याचा लवकर शोध लागावा अशी आशा मॅथ्यूनं केली आहे.