Viral video: समुद्रात मासे पाहण्याचा आनंद काही औरच असतो. त्यातही डॉल्फिन, व्हेल असे कधीतरी पाहायला मिळणारे भलमोठे मासे दिसले तर मग काय विचारूच नका. काही समुद्रांमध्ये असे मासे मोठ्या संख्येने असतात. तिथं लोक आवर्जून फक्त हे मासे पाहण्यासाठी जातात. काही जण समुद्र जवळून पाहण्यासाठी, फिरण्यासाठी क्रूझवरही जातात. समुद्राच्या मधोमध जाऊन तिथला अनुभव घेण्यासाठी अनेक जण जात असतात. बोटीतलं जीवन कसं असतं हे प्रत्येकालाच पाहायचं असते. दरम्यान, हे रिस्कीसुद्धा तितकंच आहे, कारण समुद्र कधी खवळेल हे सांगता येत नाही. समुद्र कधीही त्याचं विशाल रूप धारण करतो. असाच जहाजावर समुद्र पाहण्यासाठी आलेली एक व्यक्ती जहाजातून थेट समुद्रात पडल्याची घटना समोर आली आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नॉर्वेजियन स्पिरिट क्रूझ जहाजातून एक प्रवासी समुद्रात पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे क्रूझ जहाज तैवानला परत जात असताना ही घटना घडली. ही घटना ८ ऑगस्ट रोजी घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ एकाने फोनमध्ये कैद केला आहे. प्रवासी थेट जहाजाच्या वरच्या मजल्यावरून खाली पडला असून पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती त्याच्या कुटुंबासोबत जहाजावर उभं राहून समुद्राचा आनंद घेत आहे. सगळं काही व्यवस्थित दिसत असतानाच अचानक एक व्यक्ती वरून थेट समुद्रात पडल्याचं दिसत आहे. यावेळी हे कुटुंबही घाबरतं आणि मागे येतं. थोडावेळ इथे काय घडलं हे कोणालाच कळलं नाही. मात्र, प्रवासी पडताच जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. पडलेल्या व्यक्तीचा शोध घेता यावा यासाठी सुमारे ४० मिनिटे जहाज थांबवण्यात आले. मात्र, काही वेळाने त्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. समुद्रात पडलेली व्यक्ती तैवान येथील नागरिक होता. ली असे त्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे क्रूझवरील इतर प्रवाशांनाही मोठा धक्का बसला आहे. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> “कोल्हापूरच्या आजीचा नाद नाय” भाजी विकून बांधला १ कोटीचा बंगला; VIDEO पाहून अवाक् व्हाल या घटनेनंतर क्रूझवरील प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. क्रूझ जहाजाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या दु:खद घटनेबाबत अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा व्हिडीओ @Morbidful नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल. नेटकरीही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.