Viral video of Uttarakhand tiger attack: घनदाट जंगल आणि वन्य प्राण्यांचे जीवन पाहिले अनेकांना वाटते की किती सुखी जीवन आहे. पण दिसतं तसं नसतं. जंगलात प्रत्येक पाऊलावर संकट दडलेलं असते. वन्य प्राणी नेहमीच सतर्क असतात कारण संकट कोणत्या दिशेने येईल हे सांगता येत नाही. वन्य प्राण्यांच्या शिकारीचे कित्येक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज सातत्याने व्हायरल होत असतात जे जीवन-मृत्यूचा खेळ दाखवतात. कल्पना करा अशीच एखादी शिकार तुमच्या डोळ्यादेखत घडली तर…? अशाच एका थरारक शिकारीचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये एक वाघ मानवी वस्तीजवळ येऊन दिवसाढवळ्या एका घोड्याची शिकार करत असल्याचा थरारक प्रसंग दिसत आहे. शिकार पाहून लोकांच्या काळाजाचे पाणी झाले आहे.
उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यातील रामनगरच्या गर्जिया परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवार, १७ ऑगस्ट रोजी,दुपारी सुमारे १:३० वाजता राष्ट्रीय महामार्ग ३०९ जवळ, झुला पुल चौकाजवळ आणि पूर्वी स्थापित गर्जिया पर्यटन क्षेत्राच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. लोकवस्तीच्या इतक्या जवळ वाघाच्या उपस्थितीमुळे रहिवासी आणि पर्यटकांमध्ये चिंतेचे वातवरण निर्माण झाले आहे.
गर्दीच्या परिसरात वाघाचा घोड्यावर हल्ला
व्हायरल व्हिडिओनुसार, जंगलातील झाडीमधून अचानक वाघ रस्त्याजवळ आला. रस्त्यावर लोक उपस्थित असताना त्याने थेट घोड्यावर हल्ला केला. जबड्यामध्ये घोड्याची मान पकडून त्याचा मृतदेह फरफटतच जंगलाच्या दिशेने ओढत नेतो. पुढच्याक्षणी झुडपांच्या पलीकडे गायब होतो. हे दृश्य इतके भयावह होते की पाहणाऱ्याच्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहिला होता. थरारक दृश्यांमुळे परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली. ही घटना दिवसाढवळ्या झुला पुल चौकाजवळ घडली, जिथे स्थानिक आणि पर्यटकांची नियमित वर्दळ असते. वाघाचे मानवी वस्तीजवळ असणे हे धोकादायक आहे कारण आज प्राण्याची शिकार होत असेल तर उद्या एखाद्या व्यक्तीची शिकार देखील होण्याचा धोका वाढतो.
वन विभागाने निगराणी वाढवली (Forest department increases surveillance)
या घटनेनंतर, वन विभागाने परिसरात गस्त आणि निगराणी वाढवली आहे. रामनगर वन विभागाचे पथक आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवून असून वाघाच्या हालचालींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
रामनगर वन विभागाचे रेंज ऑफिसर, कृष्णा सिंग मेहरा यांनी सांगितले की, पथके परिसरावर सतत लक्ष ठेवून आहेत आणि वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून सतर्क राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत, असे वृत्त लेटेस्टलीने दिले आहे.
रहिवासी, पर्यटकांना सतर्क राहण्याचा सल्ला (Residents tourists advised to be vigilant)
वाघ परिसरात असेपर्यंत स्थानिक आणि पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी आणि जंगलाकडे, विशेषतः झुलत्या पुलाकडे आणि लगतच्या परिसराकडे जाणे टाळावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. रहिवाशांना मुलांना जंगल आणि पुलाच्या परिसरापासून दूर ठेवण्याचा आणि ज्या ठिकाणी वाघ दिसला आहे, त्या ठिकाणी अनावश्यक हालचाल टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
या परिसरात अनेक वेळा वाघाच्या हालचाली झाल्याचे वृत्त आहे. ताज्या घटनेत, दिवसाढवळ्या मानवी वस्तीजवळ एका घोड्याला ठार मारल्याने सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे. वन विभाग या परिसरावर सतत लक्ष ठेवून असून वाघाचा मागोवा घेत आहे. पुढील कोणतीही घटना टाळण्यासाठी आणि प्राणी व मानव यांच्यातील संघर्षाची शक्यता कमी करण्यासाठी अधिकारी निगराणी ठेवत आहेत.
