Friendship Viral Video : मैत्री हे आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर नातं असते जे आपण स्वत: निवडतो आणि आयुष्यभर जपतो. मैत्रीमध्ये स्वार्थ नसतो, द्वेष नसतो, इर्षा नसते, भेदभाव नसतो…..असतो तो फक्त विश्वास. विश्वासाच्या धाग्याने घट्ट बांधलेले नातं म्हणजे मैत्री. संकटात साथ न सोडता, दु:खात आधार देऊन, न विसरता एकमेकांच्या सुखात आनंद होऊन, वाट चुकल्यावर योग्य वाट दाखवून, आयुष्यात काहीही झाले तरी एकमेकांवर कायम विश्वास ठेवणारे नाते म्हणजे मैत्री. तुमच्या आनंदात आनंदी होणारा, तुमच्या यशाचे कौतुक करणारा मित्र भेटणे यापेक्षा सुंदर काही असू शकत नाही. अशाच एका मैत्रीच्या नात्याची झलक दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ एसटी कर्मचाऱ्यांचा आहे. व्हिडीओमध्ये निस्वार्थ मैत्रीचा एक सुंदर क्षण कैद झाला आहे. अनोख्या पद्धतीने त्यांनी मित्राचा सेवानिवृत्तीचा क्षण साजरा केला आहे. या व्हिडीओने अनेकांचे मन जिंकले आहे.

बस चालकाचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडीओ हा गुहागर बस आगारातील असल्याची माहिती मिळते. एसटी चालक उदय जोशी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांच्या मित्रानं त्यांना खांद्यावर उचलून घेत अनोख्या व भावनिक पद्धतीनं निरोप दिला. एसटी बसमधून थेट खांद्यावर बसवून त्यांना बस आगारात घेऊन जाताना दिसत आहे. काही सेकंदाचा व्हिडिओ नेटकऱ्यांचे मन जिंकत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ ved_46_याइंस्टाग्रामवरून पोस्ट करण्यात आला असून ९५ हजार पेक्षा जास्त लोकांना आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर अनेकांनी मैत्रीचे कौतुक केले आहे. अनेकांनी काकांची ओळख देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकाने कमेंट केली की, या काकांनी आम्हाला शाळेत सोडत होते. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा.

दुसऱ्याने कमेंट केला की, “खूप काळानंतर मनाला भावणारा आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे दे दाखवून देणारा व्हिडीओ पाहावयास मिळाला आहे.”

तिसऱ्याने कमेंट केली की, खरा मित्र तर आणखी एकजण म्हणाला की, एक नंबर जोडी.