Jantar Mantar Protest: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान एका तरुणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले अन् बसमधून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना एका तरुणीने असे काही केले ज्याची कोणी कधी कल्पनाही केली नव्हती. तरुणीची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे दोन गट पडले असून त्यांच्यात वाद निर्माण झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, पोलीस ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांना बसमधून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान एक तरुणी बसची चावी घेऊन पळून जाताना दिसते अन् पोलिसांना रोखते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी तरुणीच्या कृतीचे कौतुक केले, तर काहींनी कायदेशीर दृष्टिकोनातून या कृतीवर प्रश्न उपस्थित केले.
ही घटना दिल्लीमध्ये मतदारयादीतील बदल आणि निवडणूक आयोगाशी संबंधित मागण्यांसाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनादरम्यान घडली. या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान काहींना पोलिसांनी ताब्यातही घेतले.
चावी घेऊन गर्दीत गायब झाली महिला (Woman disappears into crowd with key)
लोकांच्या धावपळीदरम्यान बसचालक बसमधील आंदोलनकर्त्यांना घेऊन जाण्याच्या तयारीत होता, तेवढ्यात एका तरुणीने बसचालकाकडून चावी हिसकावून घेतली. चावी घेतल्यानंतर तरुणी गर्दीत गायब झाली, तर काही लोकांनी चावी परत मिळवण्यासाठी तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला.
व्हायरल होत असलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये बसचालक त्या महिलेबाबत सांगताना दिसत आहे, जी चावी घेऊन पळून गेली. कारण चावीशिवाय चालक बस सुरूच करू शकत नव्हता; त्यामुळे पोलिसांना बसला धक्का मारावा लागल्याचेही दिसत आहे.
सोशल मीडियावर पेटला वाद (Social media flare-up)
या दरम्यान सोशल मीडियावर त्या महिलेच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मते मांडण्यास सुरुवात केली. ‘एक्स’वर (X) हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. कित्येक लोकांनी तरुणीच्या कृतीचे कौतुक करत तिच्या हिमतीची दाद दिली, कारण आंदोलनकर्त्यांना घेऊन जाणाऱ्या बसला तिने अडवले होते.
पण काही लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला की, सरकारी वाहनाची चावी हिसकावून घेणे आणि ते सुरू होण्यापासून रोखणे हा कायदेशीर कारवाईचा विषय ठरू शकतो का? विरोध करणे आणि पोलिसांची गाडी अडवणे यातील फरकावर चर्चा करताना अनेक नेटकऱ्यांमध्ये वाद पेटला.
पोलिसांनी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर रविवारी झालेल्या आंदोलनादरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; ज्यामध्ये दिल्ली पोलिसांचे १५ जवान जखमी झाले आणि साधारण ११० लोकांना ताब्यात घेण्यात आले. जेव्हा सुरक्षा कर्मचारी या परिसरातून जमाव हटवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडले आणि ताब्यात घेतलेल्या लोकांना घेऊन जाणाऱ्या बसलाही अडवले होते.
