Aajibai’s fugadi in front of ganapati bappa viral video: नुकताच देशभरात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. ७ सप्टेंबरच्या गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. घरोघरी, मोठ-मोठ्या मंडळांमध्ये गणरायाचं आगमन झालं आणि सुखकर्ता दु:खहर्ता म्हणत या सणाला सुरुवात झाली. अवघ्या दहा दिवसांच्या मुक्कामानंतर १७ सप्टेंबरला गणपती बाप्पाने सर्वांचा निरोप घेतला अन् अनंत चतुर्दर्शीला गणरायाचा विसर्जन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.

गणेशोत्सव म्हटलं की मुंबई-पुण्याच्या गजबजाटासह अनेकांना ओढ लागते ती कोकणाची. कोकणातील गणेशोत्सव म्हणजे कोकणकरांचा जिव्हाळ्याचा सण. कोकणातील घरोघरी बाप्पा विराजमान झालेले असतात, त्यामुळे तिथलं वातावरण अत्यंत भक्तीमय असतं. आरती, पूजा, भजन-कीर्तन तर कधी खेळ, नाच-गाणी यात भाविक मग्न असतात.

हेही वाचा… विद्यार्थ्यांची मारामारी होताच वर्गात धावत गेली शिक्षिका अन्…, पुढे घडलं काही भलतंच, पाहा VIRAL VIDEO

कोकणात पिढ्यानपिढ्या चालत आलेली गाणी, पारंपरिक लोककला, नृत्य अजूनही तितकंच जपलं गेलंय. याचं भक्कम उदाहरण म्हणजे या व्हायरल झालेल्या आजी. सध्या सोशल मीडियावर एका आजीबाईंचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत वयोवृद्ध आजी गणपती बाप्पासमोर फुगडी घालताना दिसतायत.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओत आजीबाई मालवणी भाषेत एक गाणं गाताना दिसत आहेत. गाण्याबरोबरच या वयातही त्या फुगडी घालताना आणि थिरकताना दिसतायत. त्यांची सून आणि लेक यासाठी त्यांना प्रोत्साहित करत आहेत. त्यांच्या घरात गणराज विराजमान झाले आहेत आणि याच आनंदात आजी मग्न होऊन फुगडी घालताना दिसतायत.

हा व्हिडीओ @prabhattt.06_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला “आजीची फुगडी भारी” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओला चार लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत, तर २३ हजारांपेक्षा जास्त जणांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

हेही वाचा… काकांचा जबरदस्त डान्स! डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन काकांनी धरला ठेका, कोकणातील गणरायाच्या विसर्जनाचा VIDEO VIRAL

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “खूप छान आजी”, तर दुसऱ्याने “आजी भारीच आहात, एक नंबर नाच” अशी कमेंट केली; तर एक जण कमेंट करत म्हणाला, “जुनी आठवण करून दिली, तेव्हा माणुसकी होती, परंपरा होती, आदर होता आणि जगण्याची आशा ही होती.”

दरम्यान, या आजींचे याआधीही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात त्या त्यांच्या कुटुंबासह दिसल्या आहेत.