scorecardresearch

SBI Fraud Scam: बँकांची २२ हजार कोटींची फसवणूक; मराठी दिग्दर्शक म्हणतो, “साधं घर घ्यायचं तर सामान्य माणसाला बॅंकवाले…”

२२ हजार ८४२ कोटींच्या घोटाळ्याचं हे प्रकरण सीबीआयने नोंदवलेल्या बँक घोटाळय़ाच्या प्रकरणांपैकी सर्वात मोठे प्रकरण आहे.

SBI Bank
एकूण २२ हजार ८४२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा खुलासा

मुंबईमधील एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांनी केलेल्या २२,८४२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची सध्या देशभरामध्ये चर्चा आहे. मोठा घोटाळा करुन मुंबईतील हे कंपनीचे मालक गुजरातमध्ये पळून गेल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याच घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन आता मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नाराजी व्यक्त करणारं ट्विट करत, “नेमके अच्छे दिन आहेत कोणाचे?” असा प्रश्न उपस्थित केलाय. एबीजी शिपयार्ड घोटाळा प्रकरणामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय़ने) गुन्हा दाखल केला असून याच पार्श्वभूमीवर केदार शिंदेंनी सर्वसामान्यांकडे कर्जासाठी किती कागदपत्रे मागितली जातात याचाही दाखला दिलाय.

घडलंय काय?
बँक घोटाळय़ाच्या हाताळलेल्या सर्वात मोठया प्रकरणात, भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाची कथितरीत्या २२,८४२ कोटी रुपयांनी फसवणूक केलीय. या कंपनीला २८ बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्जाची सुविधा मंजूर करण्यात आली होती व त्यापैकी स्टेट बँकेचा वाटा २४६८.५१ कोटी रुपयांचा होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीबीआय़ने गुन्हा नोंदवल्याचं सर्वात मोठं बँक घोटाळा प्रकरण…
२०१२ ते २०१७ या कालावधीत आरोपींनी मिळून संगनमत केले आणि निधी इतरत्र वळवणे, त्याचा गैरवापर करणे आणि फौजदारी स्वरूपाचा विश्वासघात यांसह इतर बेकायदेशीर कामे केली, असेही अधिकारी म्हणाले. सीबीआयने नोंदवलेले बँक घोटाळय़ाचे हे सर्वात मोठे प्रकरण आहे.

आरोपी कोण?
अग्रवाल यांच्याव्यतिरिक्त सीबीआयने तत्कालीन कार्यकारी संचालक सनातनम मुत्तुस्वामी, संचालक अश्विनी कुमार, सुशीलकुमार अग्रवाल व रवी विमल नेवेतिया, तसेच दुसरी एक कंपनी एबीजी इंटरनॅशनल प्रा.लि. यांनाही गुन्हेगारी स्वरूपाचे कारस्थान, फसवणूक, फौजदारी स्वरूपाचा विश्वासघात आणि पदाचा गैरवापर या आरोपांखाली भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये नोंदवलेल्या गुन्ह्यात आरोपी केले आहे.

पहिली तक्रार कधी?
या घोटाळय़ाच्या संबंधात बँकेने सर्वप्रथम ८ नोव्हेंबर २०१९ रोजी तक्रार नोंदवली होती व सीबीआयने त्याबाबत १२ मार्च २०२० ला काही स्पष्टीकरण विचारले होते. यानंतर त्याच वर्षी ऑगस्टमध्ये बँकेने नव्याने तक्रार नोंदवली. तिची सुमारे दीड वर्षे पडताळणी केल्यानंतर सीबीआयने कार्यवाही करत ७ फेब्रुवारी २०२२ रोजी एफआयआर दाखल केला.

केदार शिंदे काय म्हणतात?
याच घोटाळ्यातील रक्कमेची आकडेवारी ट्विट करत केदार शिंदेंनी एक ट्विट केलंय. “२२ हजार कोटी? म्हणजे नेमके किती शुन्य? एवढा बॅंक घोटाळा करून त्या लोकांनी गुजरातमधून पलायन केलं. साधं घर घ्यायचं तर सामान्य माणसाला हे बॅंकवाले एवढं पेपरवर्क करायला लावतात. त्यात जे घर आहे ते पण तारण ठेवतात. नेमके अच्छे दिन आहेत कोणाचे?”, असं केदार शिंदेंनी म्हटलंय.

याच प्रकरणावरुन विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केलीय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-02-2022 at 11:02 IST
ताज्या बातम्या